मुंबई - मुंबईतील दिव्यांगांच्या समस्यांच्या चर्चांविषयी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मंगळवारी महापालिका मुख्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत दिव्यांगांच्या काही गटाने गदारोळ केल्यानंतर ही बैठक तहकूब करण्यात आली.
या बैठकीला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड, उपायुक्त (विशेष) निधी चौधरी आणि मिलिन सावंत आदी अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. दिव्यांगांच्या विविध समस्यांबद्दल पालिका मुख्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईतील दिव्यांगांच्या १५ ते २० संस्थांचे प्रतिनिधी यावेळी हजर होेते. बैठक सुरू होताच दिव्यांगांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी महापालिकेने काय उपाय केले आहेत, कोणकोणते निर्णय घेतले आहेत, याची माहिती जऱ्हाड आणि निधी चौधरी यांनी देण्यास सुरुवात केली. दिव्यांगांना देण्यात आलेल्या स्टॉल्सवर सिगारेट, बिडी आदी नशा करणाऱ्या वस्तू ठेवता येणार नाहीत, त्याची विक्री करण्यास मनाई आहे, असे निधी चौधरी यांनी सांगताच काही दिव्यांगांनी आरडाओरड करून त्यांच्या बोलण्यात व्यत्यय आणला. १५ मिनिटे हा गोंधळ सुरू होता. तो संपत नसल्याचे पाहून मनोहर जोशी यांनी महापौरांना ही बैठक तहकूब करण्याची सूचना केल्यानंतर महापौरांनी बैठक तहकूब केली.