मुंबई - बेस्टची आर्थिक स्थिती खराब आहे. बेस्टचा वाढणारा तोटा आणि कमी होणारी प्रवासी संख्या यामुळे बेस्ट प्रशासनातर्फे आपला महसूल वाढवण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट प्रशासनाने आता प्रवाशांना पास काढण्यासाठी आरएफआयडी कार्डची आवश्यकता लागणार नाही. हे कार्ड नसतानाही बेस्टचा दैनंदिन पास कोणत्याही प्रवाशाला काढता येणार आहे.
बेस्टचा दैनंदिन पास काढण्यासाठी प्रवाशांकडे आरएफआयडी कार्ड असणे बंधनकारक करण्यात आले होते. या कार्डसाठी प्रवाशांना काही रुपये मोजावे लागत होते; परंतु अनेक प्रवाशांक डे हे आरएफआयडी कार्ड नसल्यामुळे ते पास काढू शकत नव्हते. त्यामुळे प्रवाशांमध्ये एक प्रकारची नाराजी पसरली होती. परिणामी, बेस्ट प्रशासनाने सर्वच प्रवाशांना बसपास काढता यावा, या उद्देशाने आरएफआयडी कार्डचे बंधन शिथिल करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. यामुळे प्रवाशांची संख्या आणि महसूल वाढण्यास मदत होईल, अशी आशा बेस्ट प्रशासनाला आहे. बेस्ट समितीच्या होणाऱ्या बैठकीमध्ये हा प्रस्ताव बेस्ट समितीच्या मंजुरीसाठी येणार आहे. बेस्टतर्फे मुंबई शहरासाठी ५० रुपये, उपनगरीय ६० तर संपूर्ण मुंबईसाठी ९० रुपयांचा बसपास आहे. मुंबई शहरात फिरण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्या प्रवाशांनादेखील याचा फायदा होऊ शकणार आहे.