घातपाताचा मोठा कट उधळला, हिंदुत्ववादी संघटनेच्या तिघांना अटक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 August 2018

घातपाताचा मोठा कट उधळला, हिंदुत्ववादी संघटनेच्या तिघांना अटक

मुंबई - मुंबई, पुणे, सातारा, नालासोपारा आणि सोलापूर येथे घातपात घडविण्याचा कट केल्या प्रकरणी सनातन संस्था आणि शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना एटीएसने अटक केली आहे. गुरुवारी रात्री नालासोपारा येथील सोपारा गावात छापा टाकून वैभव राऊत या हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यासह अन्य दोघांना अटक केली. शरद कळस्कर आणि सुधन्वा गोंधळेकर अशी त्यांची नावे असून गोंधळेकरला पुण्यातून ताब्यात घेण्यात आले. यातील वैभव राऊत व शरद कळस्कर हे दोघे सनातनचे कार्यकर्ते असल्याची माहिती उपलबध झाली आहे, तर सुधन्वा गोंधळेकर संभाजी भिडे यांच्या शिव प्रतिष्ठान संस्थेचा कार्यकर्ता आहे. 

स्वातंत्र्य दिन, त्यानंतर येणारा बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणांनी आपले नेटवर्क कार्यरत केले होते. संशयास्पद व्यक्तींवर पोलिसांनी करडी नजर ठेवली होती. त्यातून हा घातपाताचा कट उघडकीस आला आहे. महाराष्ट्र एसटीएसने गुरुवारी नालासोपारा पश्चिमेला असणा-या भंडाराआळी गावात वैभव राऊत यांच्या घरी धाड टाकली. त्याच्याकडे ८ जीवंत बॉम्ब सापडले आहेत. शिवाय गनपावडर, डिटोनेटर असे आणखी किमान १२ बॉम्ब बनविता येतील, इतके साहित्य जप्त करण्यात आले आहे. चाळीस वर्षीय वैभव राऊत हा नालासोपारातील स्थानिक रहिवाशी असून तो अनेक वर्षापासून येथे वास्तव्यास आहे. २०१२ पासून हिंदुत्व संघटनेशी व त्यांच्या कार्यक्रमात सक्रीय आहे. वसई भागातील हिंदू एकतेसाठी चळवळीत त्याचा सक्रीय सहभाग आहे. तसेच वैभव राऊत हा हिंदू गोवंश रक्षा समितीसाठी काम करत होता. सनातनच्या अनेक कार्यक्रमात त्याचा सहभाग होता. नालासोपा-यात वैभव राऊत तरुणांना शस्त्रास्त्राचे प्रशिक्षण देत असल्याची माहितीही पुढे आली आहे. या तिघांनाही एसटीएसने शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना १८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या तिघांच्या तपासातून आणखी धक्कादायक माहिती पुढे येत असून आणखी काहीजणांना येत्या काळात अटक होऊ शकते, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

दाभोलकर, पानसरे हत्या प्रकरणात चौकशी - 
नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम.एम. कलबुर्गी तसेच गौरी लंकेश याच्या हत्या प्रकरणांतही या तिघांची चौकशी करण्यात येणार असल्याचे एटीएसने म्हटले आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील काही ठिकाणे आणि पुरोगामी विचारसरणीच्या व्यक्ती यांच्या टार्गेटवर असल्याची शक्यता एटीएसने व्यक्त केली आहे.

Post Bottom Ad