मुंबई - भारताचे माजी क्रिकेट कर्णधार अजित वाडेकर यांचे बुधवारी मुंबईत निधन झाले. निधन समयी ते ७७ वर्षांचे होते. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात ज्या प्रमुख नावांचा उल्लेख जेव्हा केला जाईल, त्यात अजित वाडेकर यांचे नाव नेहमीच अग्रेसर असेल. एक फलंदाज म्हणून तसेच यशस्वी कर्णधार म्हणून त्यांनी भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव नोंदवले होते. यशस्वी क्रिकेटपटू, कर्णधार, प्रशिक्षक, प्रशासक अशा विविध स्तरावर त्यांनी भारतीय क्रिकेटची सेवा केली होती. १९६६ ते १९७४ अशा आठ वर्षांच्या कालखंडात वाडेकरांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. पण या छोट्या कालावधीतही त्यांनी केलेली कामगिरी सदोदित लक्षात राहणारी अशीच आहे. भारताला परदेशातील पहिलावहिला ऐतिहासिक विजय मिळवून देणारे कर्णधार म्हणून वाडेकर यांचा उल्लेख क्रिकेटच्या इतिहासात झाला आहे. अभ्यासात हुशार असलेले वाडेकर हे इंजिनीअर होणार होते, पण त्यांना क्रिकेटची जास्त आवड होती त्यामुळे त्यांना क्रिकेटकडे ओढले. बारावा खेळाडू म्हणून ते रुईया कॉलेजातून खेळू लागले. १९७१च्या त्या वर्षात त्यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने वेस्ट इंडिजसारख्या बलाढ्य संघाला मात देण्याचा पराक्रम केला. इंग्लंडलाही धूळ चारली. म्हणूनच भारताला परदेशात जेव्हा जेव्हा यश मिळाले त्याची मुहूर्तमेढ वाडेकर यांनीच रोवले. मन्सूर अली खान पतौडी यांच्याकडून कर्णधारपदाची सूत्रे विजय मर्चंट यांच्या निर्णायक मताच्या आधारे वाडेकर यांच्याकडे आली होती. तो निर्णय वाडेकरांनी अचूक ठरवत परदेशात देदीप्यमान यश संपादन केले.
Post Top Ad
15 August 2018
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.