दिल्ली – देशात बेरोजगारीचे संकट उभे असताना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये २४ लाख जागा रिक्त असल्याचे समोर आले आहे. संसदेत सरकारकडून वेळोवेळी दिल्या गेलेल्या माहितीचे संकलन केल्यावर ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
रिक्त असलेल्या पदांमध्ये सर्वाधिक जागा शिक्षण क्षेत्रातल्या असून प्राथमिक शिक्षकांच्या ९ लाख जागा रिक्त आहेत. मार्चमध्ये सरकारकडून दिल्या गेलेल्या माहितीनुसार नागरी आणि सशस्त्र पोलीस दलांमध्ये साडेचार लाख पदे रिक्त आहेत. न्यायालयांमध्ये ५८५३ जागा, अंगणवाडी सेविकांच्या २ लाख जागा आणि टपाल खात्यामध्ये ५४ हजार जागा रिक्त असल्याचीही माहिती समोर आली आहे. संरक्षण खात्यातही मोठय़ा प्रमाणात जागा रिक्त आहेत. सशस्त्र सैन्यदलात ६२ हजार तर पॅरामिलिटरीत ६१ हजार जागा रिक्त आहेत. दरम्यान रेल्वेमध्ये अडीच लाख जागा रिक्त असून यातील बहुसंख्य जागांच्या नोकर भरतीसाठी नुकतीच रेल्वेने नोटीस जाहीर केली आहे. भारतामध्ये तीन कोटींहून अधिक युवक बेरोजगार आहेत.