नागपूर - मुंबईतील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात येत असून त्यातील शिवाजी महाराजांचा पुतळा जगातील उंच पुतळा असणार आहे. पुतळ्याच्या उंचीबाबत विधानसभा विरोधी पक्षनेते आणि गटनेत्यांची स्वतंत्र बैठक घेऊन स्मारकाचे आराखडे सादर केले जातील. त्यावर केलेल्या सूचना मान्य केल्या जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले. यासंदर्भात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, सदस्य अजित पवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्याला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, या स्मारकाचा पहिला आराखडा केंद्रीय पर्यावरण विभागाकडे पाठविला त्यावेळेस 20 टक्के चबुतरा आणि 80 टक्के पुतळा असे स्कीमॅटीक डिझाईन होते. मात्र समुद्रातील वारा आणि अन्य बाबींचा विचार करून सल्लागार संस्थेने 40 टक्के चबुतरा आणि 60 टक्के पुतळा असे डिझाईन तयार केले. हे स्मारक मध्य समुद्रात असल्याने सल्लागार संस्थेने आराखडा अंतिम केला आहे. तरीदेखील विरोधी पक्षनेते, गटनेते यांची स्वतंत्र बैठक घेऊन आराखड्यावर चर्चा केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.