मुंबई 8/7/2018 - मुंबईकर नागरिकांना सोयी सुविधा देण्यासाठी विविध सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून रस्ते खोदले जातात. काम झाल्यावर त्या कंपन्या खड्डे बुजवतात. काहीवेळा हे खड्डे योग्य प्रकारे बुजवले जात नाहीत. यामुळे अपघात होतात. अपघात झाल्यावर पालिकेवर टिका होत असल्याने पालिकेने खड्डे खोदण्यासाठी नियम कडक करण्याचा निर्णय घेतला आहे.
विद्युत पुरवठा, दूरध्वनी सेवा, गॅस वितरण यासारख्या सेवा नागरिकांना देण्यासाठी तसेच केबल टाकण्यासाठी रस्त्यांवर खड्डे खोदण्यात येतात. ज्या ठिकाणी खड्डे खोदले जातात त्या ठिकाणी काम चालू असताना बॅरिकेड्स लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. काम सुरु असलेल्या ठिकाणी कोणत्या कंपनीचे काम सुरु आहे हे समजावे म्हणून कंपनीचे नाव व संपर्क क्रमांक लिहिणे सक्तीचे केले आहे. तसेच काम संपल्यावर नंतरही सेवा पुरवणारी कंपनीचे नाव व संपर्क क्रमांक लिहिणे सक्तीचे केले आहे. खड्डे खोदणाऱ्या कंपन्यांना अशी सक्ती केल्याने काही दुर्दैवी दुर्घटना घटना घडल्यास त्याची जबाबदारी निश्चित करून पोलिसांमध्ये तक्रार करता यावी म्हणून सविस्तर मसुदा तयार केला जात असल्याची माहिती पालिकेच्या अभियांत्रिकी सेवेचे संचालक विनोद चिटोरे यांनी दिली.