रायगड - दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या सहलीची बस शनिवारी सकाळी 11. 30 च्या सुमारास रायगडच्या आंबेनळी घाटात कोसळली. जिल्हा प्रशासन, पोलीस, एनडीआरएफ, स्थानिक ट्रेकर्सच्या मदतीने अपघातामधील 30 मृतदेह बाहेर काढण्यात आले. सर्व मृतदेह बाहेर काढल्यानंतर शोधकार्य थांबवण्यात आले आहे.
दापोली कोकण कृषी विद्यापीठातील सहलीला गेलेल्या चार अधीक्षकांपैकी तिघा जणांचा तसेच चार सहाय्यक अधीक्षक, नऊ वरिष्ठ लिपीक, 11 कनिष्ठ लिपीक, एक लॅबबॉय आणि दोन चालकांसह एकूण 30 जणांचा या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी रात्रीपर्यंत जवान आणि ट्रेकर्सनी 21 मृतदेह बाहेर काढले होते. यानंतर अंधार पडल्याने शोधकार्य थांबवण्यात आले होते, आज (रविवारी) सकाळी पुन्हा मृतदेह बाहेर काढण्यास सुरुवात करून 9 मृतदेह बाहेर काढले.