नवी दिल्ली - एससी-एसटी कायदा कमकुवत केल्यामुळेच माजी न्यायाधीश आदर्श कुमार गोयल राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्याचा आरोप करत त्यांना या पदावरून हटविण्याची मागणी लोकजनशक्ती पार्टीने केली आहे.
रामविलास पासवान यांचे चिरंजीव चिराग पासवान यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली आहे. 'सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आदर्श कुमार गोयल यांनी एससी, एसटी अॅक्ट कमकुवत केला. त्यामुळेच निवृत्तीनंतर केंद्र सरकारने त्यांना बक्षिसी म्हणून न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदी नियुक्त केले आहे. त्यामुळे गोयल यांना अध्यक्षपदावरून तत्काळ हटविण्यात यावे. तसेच अध्यादेश काढून एससी-एसटी अॅक्ट पूर्ववत करावा. आमच्या या मागण्या मान्य न केल्यास येत्या ९ ऑगस्टपासून लोजपा आंदोलन करेल,' असा इशारा चिराग पासवान यांनी दिला आहे. 'गोयल यांना हटविण्यासाठी ९ ऑगस्ट रोजी दलित संघटनांकडून देशव्यापी निदर्शने करण्यात येणार आहेत. २ एप्रिल रोजी झालेल्या 'भारत बंद' पेक्षाही ही निदर्शने तीव्र असतील,' असा इशारा त्यांनी दिला. 'काही मुद्द्यांवर आम्ही भाजपला पाठिंबा दिला आहे. टीडीपीसारखं आम्ही एनडीएतून बाहेर पडणार नाही. आम्ही सरकारमध्ये राहून दलितांच्या हितासाठी आवाज उठवत राहू. आमच्या संयमाची परीक्षा पाहू नये. पंतप्रधानांनी त्यावर त्वरीत निर्णय घ्यावा,' असंही पासवान म्हणाले.