नवी दिल्ली - तालिबान्यांनी पाकिस्तानमच्या स्वात घाटात दगडावरील कोरीव तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती २००७ मध्ये तोडली होती. याचा जगभरातून निषेध करण्यात आला. या घटनेला ११ वर्षे लोटली आहे. एका दशकानंतर तालिबान्यांना तथागत गौतम बुद्धांपुढे नतमस्तक व्हावं लागलं आहे. ती बुद्धांची मूर्ती पुन्हा एकदा शांतीचं शक्तीशाली प्रतिक म्हणून उद्यास येत आहे.
दगडात कोरलेली ऐतिहासिक बुद्धाची मूर्ती २००७ साली डायनामाइट लावून पाकिस्तानी तालिबान्यांनी तोडण्याचा प्रयत्न केला. शांतीचा संदेश देणाऱ्या या मूर्तीचे फार मोठे नुकसान झाले होते. तालिबान्यांच्या या निर्दयी कृत्याचा जगभरातून निषेध केला गेला. कट्टरवादी तालिबान्यांनी ऐतिहासिक ओळख नष्ट करण्यासाठी आणि संस्कृती संपवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला होता. या हल्ल्यानंतर असंख्य संतापजनक प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. २० फुट उंच असलेली बुद्धाची मूर्ती तोडण्यासाठी दहशतवादी मूर्तीवर चढले. त्यांनी मूर्तीमध्ये स्फोटकं ठेवली व स्फोट घडवून आणला. या स्फोटामुळे मूर्तीचे फार नुकसान झाले. बुद्धांच्या मूर्तीच्या चेहऱ्याचे नुकसान झाले. बुद्धांची मूर्ती ही इस्लाम विरोधी असल्याचे तालिबान्यांनी म्हटले होते. परंतु, दशकानंतर ही मूर्ती पुन्हा एकदा आकार घेत असून शांतीचं प्रतिक बनत आहे.
माझ्या संस्कृतीवर आणि माझ्या इतिहासावर हल्ला केल्याचा भास मला झाला होता. बुद्धांच्या मूर्तीवर ज्या दिवशी हल्ला झाला त्यादिवशी मला माझ्या वडिलांची हत्या झाली असे वाटले, असा संताप स्वातमधील एका बुद्धीस्ट विचारवंतानं व्यक्त केला.