नवी दिल्ली - अनिवासी भारतीयांसोबतच्या एनआरआय विवाहांमध्ये येणाऱ्या समस्यांना दूर करण्यासाठी आणि दोषी व्यक्तीस तातडीने पकडण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन वॉरंट आणि समन्स जारी करण्याचा शासन विचार करीत आहे, अशी माहिती परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी दिली.
‘एनआरआय विवाह’ हा विषय आता राज्याचा विषय राहिला नसून देशभरातील सर्व राज्यांमध्ये पीडित महिलांच्या संख्यांमध्ये प्रचंड वाढ होत आहे. या प्रकरणांमध्ये कुटुंबातील व्यक्तींचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येतो. नवविवाहित युवतींना संरक्षण मिळावे, यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही ठोस पावले उचलली आहेत. मंत्रालयाच्या संकेतस्थळावरून थेट वॉरंट आणि समन्स जारी करण्याचा प्रयत्न सुरू असून लोकसभेच्या या अधिवेशनात किंवा पुढच्या अधिवेशनात या विधेयकास मंजुरी मिळेल, यामुळे दोषी व्यक्ती जगात कुठेही असल्यास त्याला तातडीने पकडता येईल. यासह अनिवासी भारतीयांसोबत विवाह झाल्यास नवविवाहित मुलीच्या नावे संपत्तीत वाटा असावा याबाबतही कायदे बनविण्यासंदर्भात संशोधन सुरू असल्याचे स्वराज यांनी सांगितले.
सध्या अनिवासी भारतीयांसोबतच्या विवाहामध्ये तातडीने करावयाच्या बदलांमध्ये दोषी असलेल्या व्यक्तीची तक्रार केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाला केल्यास, संबधित व्यक्तींचे पासपोर्ट रद्द करण्यात येतात. यामुळे पीडित महिलांना न्याय मिळण्यास मदत होत असल्याचेही स्वराज यांनी सांगितले. याशिवाय एनआरआय व्यक्तीसोबत विवाह करताना संपूर्ण चौकशी करूनच लग्नाचे पाऊल उचलण्याच्या सूचनाही स्वराज यांनी यावेळी केली.
एजंटांची माहिती शासन यंत्रणेला द्या -
आपल्या आसपास असणाऱ्या अवैधरित्या काम करणाऱ्या एजंटांची माहिती शासन यंत्रणेला देण्याचे आवाहनही स्वराज यांनी केले. त्या म्हणाल्या, मानवी तस्करी होण्यामागचे सर्वात महत्त्वाचे कारण हे अवैध एजंटांच्या माध्यमातून परदेशात जाणाऱ्यांचे आहे. पराराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या संकेतस्थळावर देशभरातील वैध एजंटांची यादी असून आपल्या शहरातील वैध एजंटांशी संपर्क करूनच परदेशात जाणे योग्य असल्याचे श्रीमती स्वराज म्हणाल्या. भविष्यातील कुठल्याही संकटसमयी परदेशातील दूतावास आपल्या मदतीसाठी सदैव तत्पर असते. यासह ज्या रोजगारांसाठी परदेशात जायचे आहे, त्याचे योग्य प्रशिक्षण घेऊनच जायचे. यासाठी पराराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालयाशी करार केलेला आहे. याचा लाभही परदेशात जाणाऱ्यांनी घ्यावा असे आवाहन स्वराज यांनी केले.