मुंबईला पावसाने झोडपले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 July 2018

मुंबईला पावसाने झोडपले


मुंबई 8/7/2018 - सलग दोन दिवस संततधार पडणाऱ्या पावसाने मुंबईला झोडपून काढले. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी झाली. एकूण 13 ठिकाणी घराच्या भिंती पडल्या. कुर्ल्यात एका तीन मजली इमारतीच्या बाल्कनीचा भाग कोसळला. यात घटनांत कोणीही जखमी झालेले नाही. 

मुंबई परिसरात १८७ मिमी, कुलाबा १६७ मिमी, शिवडी १५८ मिमी, कुर्ला १३७ मिमी, घाटकोपर १३२ मिमी, अंधेरी १६१ मिमी, वर्सोवा येथे १३१ मिमी तर बीकेसी येथे १२६ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. दक्षिण मुंबईसह पूर्व व पश्चिम उपनगरांमध्ये शनिवारी पहाटेपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली. शनिवारी पावसाने उपनगराला झोडपून काढल्यानंतर रविवारी आपला मोर्चा शहर परिसराकडे वळवला. सलग दोन दिवस पडत असलेल्या जोरदार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचले. येत्या 24 तासांत मुंबई उपनगरांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान विभागाने येत्या 24 तासांत अतिवृष्टीचा दिलेल्या इशाऱ्यानंतर पालिकेची सर्व यंत्रणा कार्यान्वित असून सर्व विभागीय अधिकाऱयांना आपआपल्या विभागात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले असल्याचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी सांगितले.

येथे साचले पाणी -
हिंदमाता, परळ टीटी, गांधी मार्केट, मुख्याध्यापक भवन, सायन, सायन रोड नंबर 24, परळ, हेमंत मांजरेकर मार्ग, सेक्टर नंबर - 6 अँटॉपहिल, शेल कॉलनी चेंबूर, पोस्टल कॉलनी बैल बाजार, काळे रोड, कुर्ला, शीतल सिनेमा, एलबीएस मार्ग, सिद्धार्थ नगर, गोरेगाव, नॅशनल वांद्रे, मिलन सबवे, कपाडिया नगर, बिकेसी आदी ठिकाणी पाणी साचले. पाणी साचल्याने काही ठिकाणी वाहतूकही दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली.

111 ठिकाणी पंप लावले - शहर व उपनगरांत मुसळधार पावसामुळे साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी 111 ठिकाणी पंप लावण्यात आले होते. यातील 18 पंप वापरून पाण्याचा निचरा करण्यात आला.

13 ठिकाणी घराच्या भिंतीचा भाग कोसळला -शहर व उपनगरांत 13 ठिकाणी घर, घराच्या भिंती पडल्या. यांत कोणीही जखमी नाही.

Post Bottom Ad