मुंबई - मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण घेता यावे, यासाठी ३५ नवीन शाळा खासगी तत्वावर सुरु करण्यात येणार आहेत. या शाळांमुळे शिशू वर्गापासून ते दहावीपर्यंतच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव शिक्षण समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी आला आहे.
पालिका शाळांचा दर्जा दिवसेंदिवस घसरतो आहे. विद्यार्थी गळतीही वाढल्याने बहुतांश शाळा बंद पडल्या आहेत. तर काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. पालकांचा इंग्रजीकडे असलेला कल यात भर घालते. विद्यार्थी संख्याही दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे पालिका शिक्षण विभागाने सार्वजनिक खासगी सहभागाने (पीपीपी) तत्वावर लहान शिशूवर्ग ते इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांकरिता ३५ आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नवीन शाळा सुरु करण्याचे प्रस्ताविले आहे. शाळांमध्ये खासगी संस्थेचे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवणार असले तरी महापालिकेमार्फत मिळणार्या मोफत २७ वस्तू, पोषण आहार अशा सर्व सुविधा विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत. गोरगरीब विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारचा आर्थिक भार पडणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घेतली आहे.
दरम्यान, काही शाळांमध्ये जागेअभावी आठवी ते दहावी पर्यंत वर्ग भरत नाहीत. हे विद्यार्थी गरजू व गरीब वर्गातील असल्याने माध्यमिक शिक्षण बाहेरुन घेणे, परवडत नाही. त्यामुळे पीपीपी तत्वावर सुरु होणाऱ्या लहान शिशू वर्ग ते इयत्ता दहावीपर्यंतचे सलग शिक्षण मिळावे, यादृष्टीने पालिकेने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नगरसेविका सईदा खान यांनी शिक्षण समितीत केली आहे.