मेट्रो ४ विरोधात घाटकोपरमध्ये धरणे आंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 July 2018

मेट्रो ४ विरोधात घाटकोपरमध्ये धरणे आंदोलन


मुंबई - वडाळा ते ठाणे कासारवडवली मेट्रो ४ मार्गाला घाटकोपरवासियांनी विरोध केला आहे. अमरमहाल ते घाटकोपर बेस्ट डेपो हा मार्ग नागरीवस्तीमधून जात असल्याने त्याचा रहिवाशांना त्रास होणार असून मेट्रोला नुकसान होणारा आहे. यामुळे या मार्गात बदल करावा या मागणीसाठी घाटकोपर नागरिक मंचच्या वतीने रविवारी धरणे आंदोलन धरण्यात आले. 
  
घाटकोपर येथील रहिवाशांनी केलेल्या धरणे आंदोलनात गारोडिया नगरमधील शेकडो महिला, पुरुष आणि तरुण-तरुणी सामील झाल्या होत्या. घाटकोपर पूर्व ९० फूट रोड, गारोडिया नगर येथे मेट्रो ४ चे काम सुरू असून, येथील सर्व रहिवाशांनी हे काम थांबवून हा मार्ग बदलण्याची मागणी केली आहे. घाटकोपर पूर्वेतील गारोडिया नगर, एम.जी. रोड, पंतनगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, अनधिकृत रिक्षा स्टॅण्ड यांची मोठी समस्या आहे. घाटकोपर पूर्वेतील याच भागातून मेट्रो ४ चा मार्ग जाणार असल्याने या समस्येत आणखीन वाढ होणार असल्याने येथील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. हा मार्ग या भागातून नेण्याऐवजी पूर्व द्रुतगती मार्गावरून वळवण्यात यावा, अशी मागणी येथील नागरिकांनी स्थापन केलेल्या घाटकोपर नागरिक मंचच्या वतीने करण्यात आली आहे. हा मार्ग बदलावा, यासाठी येथील नागरिकांनी सह्यांची मोहीम घेतली होती. ज्यात या ५ हजार नागरिकांनी सह्या करून या मार्गाला विरोध केला आहे. आमचा मेट्रोच्या विकासकामाला विरोध नाही, तर त्यांनी आखलेला मार्ग हा चुकीचा आणि मेट्रोला तोट्यात नेणारा आहे. गारोडिया नगर हा वाहतूक कोंडीसारख्या विविध समस्येच्या विळख्यात असताना त्यात अधिक भर या मेट्रोची पडणार आहे. मेट्रो ४ च्या या कामाला १६ हजार कोटी खर्च होणार आहे. गारोडिया नगर, पंतनगर या वस्तीत जवळजवळ प्रत्येकाचे वैयक्तिक वाहन असताना कुणीही मेट्रोचा वापर करणार नाही. चेंबूर ते वडाळा या मोनोरेल्वेचा मार्ग जसा प्रवासी नागरिक नसल्याने अयशस्वी झाला तसाच मेट्रो ४ चे होऊ शकते. त्याऐवजी हा मार्ग पूर्व द्रुतगती मार्गावरून वळल्यास रमाबाई नगर, कामराज नगर, अमर महल, महात्मा गांधी मार्ग येथील नागरिकांना त्याचा फायदा होऊ शकतो. अशा प्रतिक्रिया या वेळी नागरिकांनी दिल्या. या मेट्रो मार्गाच्या विरोधात घेण्यात आलेल्या ५ हजार सह्यांचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले जाणार आहे.

Post Bottom Ad