मुंबई 8/7/2018 - घाटकोपर- वर्सोवा लिंक रोडवरील पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा पूल अखेर रविवारी सकाळपासून वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. हा पूल झुकल्याची माहिती मिळताच शनिवारी रात्री तातडीने बंद करण्यात आला होता. मात्र दिवसभर दुरुस्तीचे काम हाती घेऊन हा पूल रविवारी दुपारी 12 नंतर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. दरम्यान, या पुलाच्या बाजूचे फुटपाथ बंद करण्यात आले आहे.
नित्यानंद नगर ते श्रेयस जंक्शन येथील पूल खालच्या बाजूस झुकल्याची माहिती मिळताच शनिवारी रात्री हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. माञ दुरुस्ती नंतर रविवारी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव येथील फुटपाथ तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले आहे. घाटकोपर भागात मध्य रेल्वेवर असलेल्या या पुलाखालून मेल, एक्स्प्रेस आणि लोकल जातात. ब्रिजचा काही भाग खालच्या बाजूने झुकल्यामुळे त्यावर धोक्याच्या खुणा लावल्या होत्या. ब्रिजच्या दोन्ही टोकांना बॅरिकेट लावण्यात आले होते. तसेच येथे असलेला बस स्टॉपही बंद करण्यात आला होता. अंधेरी येथील गोखले पुलाची घटना ताजी असतानाच दुसऱ्याच दिवशी ग्रँटरोड येथील पुलाला तडे गेल्याचे समोर आले. त्यानंतर आता घाटकोपर येथील पूल धोकादायक असल्याने काही तास वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. या घटनांनंतर मुंबईतील जुन्या पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला असून पालिका व रेल्वे कामाला लागली आहे. दरम्यान मुंबईतील 314 पुलांचे स्ट्रक्स्चरल ऑडिट अहवाल येत्या काही दिवसांत सादर केला जाणार आहे. या अहवालानुसार पुलांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार असल्याची माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी दिली.