मुंबई 6/7/2018 - मुंबईतील जमीन खचण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या महिन्याभरात तीन ठिकाणी जमीन खचण्याच्या घटना घडल्या आहेत. शुक्रवारी घाटकोपर पश्चिम येथील कल्पतरू ओरा इमारतीची संरक्षण भिंत आणि रस्ता खचला आहे. या घटनेमुळे इमारतीमधील रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण आहे. महापालिकेकडे वारंवार तक्रार करुनही दुर्लक्ष केल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. या इमारतीच्या बाजूला जाणाऱ्या नाल्यामुळे इमारतीला धोका निर्माण झाला आहे.
१५ दिवसामध्ये तिसरी घटना घडली आहे. दोन आठवड्यापूर्वी अँटॉप हिल परिसरामध्ये लॉयड इस्टेट इमारतीची संरक्षण भिंत खचली होती. यामध्ये १५ गाड्यांचे मोठे नुकसान झाले होते. मागील आठवड्यात काळाचौकी परिसरात असलेल्या वेस्टर्न इंडिया मिल चाळीत घराखालील जमीन खचली होती. या चाळीत एका आठवड्यात दुसरी घटना घडली होती. जमीन खचल्याने एका घरात ८ तर दुसऱ्या एका घरात १२ फुटाचा खड्डा पडला होता.