नागपूर - वैद्यकीय विषयातील पदव्युत्तर पदविका उत्तीर्ण असल्याची खोटी प्रमाणपत्रे सादर करुन बेकायदेशीर नोंदणी करणाऱ्या डॉक्टर्सवर तसेच अशी प्रमाणपत्रे देणाऱ्या संस्थेवरही कडक कारवाई करण्यात येईल असे वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य अनंत गाडगीळ यांनी खोट्या प्रमाणपत्राची नोंदणी करणाऱ्या डॉक्टर्सबाबतचा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना चव्हाण म्हणाले, या खोट्या प्रमाणपत्र प्रकरणी 53 डॉक्टर्स दोषी आढळले असून त्यापैकी 20 डॉक्टरांवर कारवाई करण्यात आलेली आहे. ज्या वैद्यकीय संस्था अशी बोगस प्रमाणपत्रे देतात त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य भाई जगताप यांनी भाग घेतला.