सँडहर्स्ट रोड रेल्वे स्टेशनच्या संरक्षण भिंतीची पालकमंत्री देसाई यांच्याकडून पाहणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 July 2018

सँडहर्स्ट रोड रेल्वे स्टेशनच्या संरक्षण भिंतीची पालकमंत्री देसाई यांच्याकडून पाहणी

मुंबई - सँडहर्स्ट रोड रेल्वे स्टेशनच्या संरक्षण भिंतीची पावसामुळे झालेली पडझड आणि भिंतीच्या काही भागाला गेलेले तडे यामुळे झालेल्या नुकसानीची मुंबई शहरचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दखल घेऊन आज प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी संभाव्य धोका टाळण्यासाठी तत्काळ उपाययोजना आणि संरक्षण भिंत दुरूस्ती करण्याचे निर्देश संबंधिताना दिले.

काही दिवसापासून सँडहर्स्ट रोड रेल्वे स्टेशनच्या संरक्षण भिंतीला तडे गेले असून काही ठिकाणी पडझड झाली आहे. तसेच डॉ.महेश्वरी रोड, डोंगरी येथील मेहेर बक्ष कम्पाऊंड मधील रेल्वे लगतच्या आधारहीन भिंतीचा 130 फूट लांबीचा भागही कोसळला आहे. त्यामुळे तेथे राहत असलेल्या 65 कुटुंबीयांच्या वास्तव्याला धोका निर्माण झाला असून रेल्वे आणि परिसर धोक्यात येऊ शकतो. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी महानगरपालिका, म्हाडा आणि रेल्वेसह सर्व यंत्रणांनी परस्पर सहकार्याने तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी दिले. यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून या भिंतीच्या पुनर्बांधणीसाठी लागणारा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती केली. देसाई यांच्याबरोबर यावेळी खासदार अरविंद सावंत, आमदार अमीन पटेल, महानगरपालिका, म्हाडा आणि रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.

Post Bottom Ad