मुंबई 6/7/2018 - बेस्टचे महाव्यवस्थापक व पालिका आयुक्त यांच्या मनमानी कारभाराला मुख्यमंत्र्यांचाच पाठिंबा आहे, असा आरोप शिवसेना प्रणित बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी केला. विविध मागण्यांसाठी शिवसेना प्रणित बेस्ट कामगार संघटना, मुंबई इलेक्ट्रिक वर्कस युनियन आणि बेस्ट कामगार क्रांती संघ या संघटनांच्या नेतृत्वाखाली बेस्ट कर्मचा-यांनी शुक्रवारी पालिका मुख्यालयावर मोर्चा काढून पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यावेळी सामंत यांनी थेट मुख्यमंत्र्यावर जोरदार टीका केली.
बेस्टमधील सद्यस्थिती, प्रशासनाचे आडमुठी धोरण, बेस्ट महाव्यवस्थापक व पालिका आयुक्त यांच्या मनमानी कारभाराविरोधात बेस्ट कर्मचा-यांनी पालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा काढला. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वचन नाम्यामध्ये मुंबईकरांना बेस्टचा आणि पालिकेचा अर्थसंकल्प एकत्र करू असे सांगितले होते. जेणे करून मुंबईची धमणी म्हणजे बेस्ट वाहिनी तरेल. त्यामुळे मी हा ठराव बेस्ट समितीमध्ये मांडला. तो स्थायी समीतीमध्ये देखील मंजूर झाला. त्याला आता ८ महिने झाले. मात्र अजूनही पालिका आयुक्तांनी महाराष्ट्र सरकारकडे पाठवलेला नाही. ठराव पाठवला नाही की पाठवू नका असे कोणी सांगितले का? हे आम्हाला कळायला हवे. जो पर्यंत हे आम्हाला कळत नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत आम्ही आयुक्तांना आणि महाव्यवस्थापकांना खुर्चीवर बसू देणार नाही, असे सांगत त्यांना मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा असल्याची टीकाही सामंत यांनी यावेळी केली. बेस्ट महाव्यस्थापकांकडे निर्णय घेण्याची क्षमता नाही, बेस्टच्या कामगारांना पदाप्रमाणे काम दिले जात नाही, त्यामुळे कामगारांची कार्यक्षमता ढासळली आहे. गेल्या दोन वर्षांकरीताचे सर्व कामगार-कर्मचारी-अधिकाऱ्यांचे रजेचे रोखीत रुपांतर, रजा प्रवास भत्ता महाव्यवस्थाकांनी रोखून धरला आहे, असा आरोपही सामंत यांनी यावेळी केला.