जळगाव - मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील आयएफसी कंपनीच्या केळी कोल्ड स्टोरेजच्या गोडाऊनमध्ये बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास अचानक स्फोट झाल्याने चार जण जागीच ठार झाले, तर ५ जण गंभीर जखमी झाले. जखमींवर बऱ्हाणपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी रावेरहून आलेल्या ॲपे रिक्षातून इथिलीनचे सिलिंडर उतरवून त्यातील गॅस भरण्याचे काम सुरू असताना ही घटना घडली. या घटनेत शिवाजी साळुंखे यांच्यासह अन्य दोघे अनोळखी व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा बऱ्हाणपूर येथे उपचार घेत असताना मृत्यू झाला. या भीषण स्फोटात दोघा कामगारांच्या शरीराचे काही भाग तुटून परिसरात पडले होते. हे कोल्ड स्टोरेज शे. लुकमान शेख इस्माईल यांच्या मालकीचे आहे. घटनास्थळी प्रचंड गर्दी झाल्याने पोलीस उपअधीक्षक सुभाष नेवे, पोलीस निरीक्षक अशोक कडलग व सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, शीतगृहाचा परवाना आहे किंवा नाही याबतची तपासणी करून संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू, अशी माहिती यावेळी पोलीस उपअधीक्षक सुभाष नेवे यांनी दिली.