मुंबई १० / ७ / २०१८ - मुंबई शहर व उपनगरात गेल्या महिन्याभरापासून सुरू झालेल्या पावसाने आतापर्यंत एकूण ३५ जणांचा बळी घेतला असून विविध भागांत घडलेल्या दुर्घटनांमध्ये ५६ जण जखमी झाले आहेत. पावसामुळे वृक्ष पडण्याच्या एकूण ९५ घटना घडल्याची माहिती पोलीस व अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिली आहे.
पादचारी पूल कोसळणे, रस्त्यांवरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनांचे अपघात होणे तसेच वृक्ष कोसळून त्याखाली मरण पावणाऱ्या लोकांचा या घटनांमध्ये समावेश आहे. या घटनांची जबाबदारी पालिका, एमएमआरडीए व सरकारी प्रशासन एकमेकांवर ढकलत असले, तरी त्यात मात्र निष्पाप जीवांचा बळी जात आहे. सुरुवातीच्याच पावसाने बळीचा हा आकडा गाठल्याने उर्वरित पावसाच्या काळात आणखी किती जणांचा बळी जाणार असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनांचा अपघात होऊन त्यात आतापर्यंत १५ जणांचा बळी गेला आहे, तर झाड कोसळून अंगावर पडून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. पाणी साचलेल्या खड्ड्यात विजेचा प्रवाह उतरल्याने त्याचा शॉक लागून चेंबूर, भांडुप, शिवाजीनगर या भागात चार लहानग्या मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. अंधेरी येथील पादचारी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या काटकर या महिलेचा देखील काही दिवसाने मृत्यू झाला.
पालिका, एमएमआरडीए प्रशासनाला व सरकारला आणखी किती जणांचे बळी हवे आहेत, की ज्यानंतर त्यांचे डोळे उघडतील. यंदा सरासरी एवढा पाऊस पडणार असल्याचे भाकीत विविध वेधशाळांनी केले आहे. असे असताना या तिन्ही यंत्रणांनी आपल्या तयारीमध्ये का उणिवा ठेवल्या, याची कसून चौकशी होऊन यातील दोषींवर अत्यंत कडक कारवाई झाली पाहिजे. न्यायालयाने या यंत्रणांना जाब विचारून संबंधितांना योग्य शिक्षा करणे गरजेचे आहे.
एखादी अप्रिय घटना घडली की, या यंत्रणा एकमेकांवर जबाबदारी ढकलून आपले हात झटकतात. मात्र, कोणीही जबाबदारी घेण्यास तयार नसते. त्यात सामान्य व निष्पाप व्यक्तीचा बळी जातो. अशा मृत व्यक्तीच्या कुटुंबाला सरकार आर्थिक मदत घोषित करून आपली जबाबदारी पार पाडते. असे किती काळ चालणार आहे? नैसर्गिक संकटाला सामोरे जाण्यासाठी कधी प्रभावी यंत्रणा उभी करणार? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.