मुंबई - मुंबईत शनिवार पासून सातत्याने मुसळधार पावसात झाडे पडणे आणि शॉर्टसर्कीटच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मुंबईत गेल्या चार दिवसात १०९ शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या असून १२४ झाडे व झाडांच्या फांद्या पडण्याच्या घटनांची नोंद झाली आहे.
मुंबईत ७ ते ८ जुलै दरम्यान २०, ८ व ९ जुलै दरम्यान २३, ९ ते १० जुलै दरम्यान ३८ तर १० जुलैला सायंकाळपर्यंत ४३ अशा एकूण १२४ झाडे व झाडांच्या फांद्या पडण्याच्या घटना घडल्या. या दरम्यान शहर विभागात ४५, पूर्व उपनगरात १२ तर पश्चिम उपनगरात ६७ झाडे व झाडांच्या फांद्या पडण्याची नोंद झाली. मुंबईत ७ ते ८ जुलै दरम्यान १२, ८ व ९ जुलै दरम्यान ३२, ९ ते १० जुलै दरम्यान ३५ तर १० जुलैला ३० ठिकाणी अशा एकूण १०९ शॉर्ट सर्किटच्या दुर्घटनांची नोंद झाली आहे. मागील महिन्यात भांडुप येथील खिंडीपाडा रोडवर शॉक लागून अनिल यादव (३२), सारा युनुस शेख (९) दोघांचा मृत्यू झाला. दुसऱ्या एका दुर्घटनेत भांडुप येथेच शॉक लागून झालेल्या आणखी एका दुर्घटनेत ओम फडतरे (१०) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर, रोहन सुतार हा जखमी झाला होता. मागील आठवड्यात मानखुर्द पीएजीपी कॉलनी येथे मोहिते पाटील नगर येथे उषा सावंत यांचा शॉक लागून मृत्यू झाला तर तिच्या पाच वर्षाच्या मुलीलाही शॉक लागला होता.