मुबंई - मेट्रो जंक्शन येथील रस्त्याखालून गेलेली पाईलपलाईन फुटल्याने रस्ता खचला आहे. पाईपलाईन फुटून मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. त्यामुळे या भागातील पाणीपुरवठयावर परिणाम होऊन रहिवाशांचे प्रचंड हाल झाले.
काळबादेवी येथील मेट्रो जंक्शन येथे गोल मस्जिदजवळून पालिकेच्या सी वार्डच्या हद्दीतील रस्त्याखालून ए विभागाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन जाते. सोमवारी सायंकाळी ४ वाजून ४३ मिनिटांनी ४५० मि. मी.ची पाईपलाईन फुटली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया गेले. याची माहिती मिळताच
ए वार्डच्या अभियंत्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दुरुस्तीचे काम हाती घेतले. मात्र यामुळे ए वार्डमधील पाणीपुरवठा काही काळ खंडित झाल्याने रहिवाशांचे पाण्याअभावी प्रचंड हाल झाले. दुरुस्तीचे काम रात्रभर सुरू ठेवण्यात येईल. पाईपलाईनची दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर सकाळी या भागातील पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती ए वार्डचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.