मुंबई - निवडणूक फंडासाठीच प्लास्टिकवर बंदी आणण्यात आली असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. 'प्लास्टिक बंदीचा निर्णय घाईघाईत कोणताही पर्याय न देता हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला मनसेचा विरोध असून प्लास्टिकला पर्याय मिळेपर्यंत लोकांनी सरकार किंवा पालिकेकडे दंड भरू नये,' असं आवाहन त्यांनी केले.
राज ठाकरे कृष्णकुंज येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना प्लास्टिक बंदीचा निर्णय हा कोण्या एकाच खात्याचा आहे काय? 'प्लास्टिक बंदीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मौन का आहेत? असे प्रश्न राज ठाकरे यांनी केले. एखाद्याला आलेला झटका म्हणजे सरकारचे धोरण होऊ शकत नाही, असा टोला लगावतानाच काही महिन्यानंतर पुन्हा 'जैसे थे' परिस्थिती निर्माण होईल, असा दावाही त्यांनी यावेळी केला. 'प्लास्टिक बंदी लागू करण्यापूर्वी सरकारने पर्याय द्यावा. बाजारात प्लास्टिकला पर्याय आल्यानंतर बंदी घालावी. पर्याय न देता एखादी असलेली गोष्ट काढून घेणं हा प्रकार नोटाबंदी सारखाच आहे. त्यामुळे जोपर्यंत पर्याय मिळत नाही, तोपर्यंत लोकांनी दंड भरू नये. आमचा या बंदीला शंभर टक्के विरोध आहे. सरकारच्या पीक विमा कर्ज योजनेची छाननी करणाऱ्या कमिटीचे अध्यक्ष रवींद्र मराठे होते. गेल्या ४ वर्षात ही योजना फसली याचे रिपोर्ट रवींद्र मराठेंनी दिले. त्यामुळेच मराठेंवर कारवाई करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. मराठे यांच्यावर कारवाई होते मग भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांवर कारवाई का केली नाही असे प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केले.