मुंबई - मध्य रेल्वेच्या मेन लाईन मार्गावरील आशिया खंडातील सर्वात जुना बोगदा म्हणून पारसिक टनेलची ओळख आहे. पारसिक बोगदा हा दिवसेंदिवस धोकादायक ठरू लागलेला आहे. या बोगद्याला गेल्या काही वर्षांपासून गळती लागल्यामुळे तो धोकादायक होत आहे. १८७३ मध्ये बांधलेला पारसिक बोगदा आशियातील सर्वात जुन्या बोगद्यांपैकी एक अहे. या बोगद्यांच्या दुरुस्तीचे काम मायनिंग ॲण्ड फ्युएल इंजिनीअरिंग संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. त्याची डेडलाईन नोव्हेंबरपर्यंत आहे.
मध्य रेल्वेच्या ठाणे आणि डोंबिवली जलद रेल्वे मार्गाच्या दरम्यान हा बोगदा आहे. सुमारे १.३ किलोमीटरचा बोगदा १८७३ मध्ये ठाण्याच्या पारसिक हिलमध्ये बांधण्यात आला होता. त्यामुळे ठाणे ते दिवा हे अंतर ९.६ किलोमीटरहून ७ किलोमीटरपर्यंत कमी झाले. एकेकाळी हा बोगदा आशियातील तिसरा सर्वात मोठा बोगदा म्हणून गणला जात होता. विद्युतीकरणानंतर या बोगद्यामध्ये दुहेरी मार्गिका टाकण्यात आली. या बोगद्यामध्ये नैसर्गिक पाण्याचे झरे आहेत, त्यामुळे या भागातून लोकलवर पाणी पडत असते. या टप्प्यात लोकलच्या वेगावर निर्बंध घालण्यात येत असल्याने प्रत्येक लोकलची सरासरी तीन मिनिटे वाया जातात. बोगद्यात असलेल्या २५ हजार व्होल्टेजच्या ओव्हरहेड वायरमुळे छताला सिमेंटचा जादा थर देणे कठीण बनले आहे. कारण त्यामुळे ओव्हरहेड वायरसाठी आवश्यक अंतर कमी होण्याची भीती आहे. त्यामुळे मायनिंग ॲण्ड फ्युएल रीसर्च इंजिनीअरिंग इ्स्टिटट्यूटच्या मदतीने दुरुस्तीचे काम पूर्ण केले जाणार असून नोव्हेंबरपर्यंत काम पूर्ण होईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक एस. के. जैन यांनी स्पष्ट केले..