मुंबई - वडाळा दोस्ती एकर येथील लॉयड इस्टेट या इमारतीजवळील जमिनीचा भाग खचल्याने अनेक गाड्यांचे नुकसान झाले. येथील रहिवाशांनी मंगळवारी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांची भेट घेतली. यावेळी निरुपम यांनी बुधवारी (२७ जून) पालिकेच्या वडाळा येथील बिल्डींग प्रपोजल विभागावर मोर्चा काढणार असल्याचे सांगितले.
वडाळा अँटॉप हिल परिसरातील दोस्ती एकर येथील विद्यालंकार कॉलेज जवळील लॉयड इस्टेट या इमारतीच्या पार्किंग जवळील रस्त्याचा काही भाग सोमवारी पहाटे पावणे पाचच्या सुमारास खचला. या दुर्घटनेत जवळपास 15 वाहने ढिगाऱ्याखाली दबली गेली. रस्ता खचून वाहनांचे नुकसान झाल्याने रहिवाश्यांमध्ये तारांबळ उडाली होती. या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. इमारती शेजारी सुरु असलेल्या बांधकामामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. याबाबत पालिकेकडे आणि पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. शेजारी सुरू असलेल्या बांधकामामुळे दुर्घटना घडल्याचा स्थानिकांचा आरोप होता. मात्र त्यांच्या तक्रारींकडे कोणीही लक्ष देत नव्हते. ब्लॉसम, कार्नेशन, लॉयड इस्टेट या 3 बिल्डींगचे 450 घरे व सुमारे 5000 रहिवाशी रस्त्यावर आल्याने या रहिवाशांनी मंगळवारी संजय निरुपम यांची भेट घेतली. रहिवाशांच्या भेटी नंतर वडाळा येथील पालिकेच्या बिल्डींग प्रपोसल विभागावर तिन्ही बिल्डींगच्या सर्व रहिवाशांसह मुंबई काँग्रेस भव्य मोर्चा काढणार असल्याचे निरुपम यांनी सांगितले. मनपा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व दोस्ती बिल्डरच्या मालकांना ताबडतोब अटक करावी आणि त्यांचे बांधकाम त्वरित थांबवावे या मागण्यांसाठी मोर्चा काढणार असल्याचे निरुपम यांनी सांगितले.