मुंबई - मुंबई वाहतूक पोलिसांनी करी रोड आणि एल्फिन्स्टन रोड ब्रीजवर सुरू केलेल्या एकेरी वाहतुकीमुळे या भागातील मुंबईकरांचा प्रचंड खोळंबा तसेच रुग्णांना रुग्णालयांमध्ये नेताना-आणताना होत असलेल्या त्रासामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष खदखद होता. अखेर शिवसेनेने या असंतोषाची दखल घेत भारतमाता येथे केलेल्या रास्ता रोकोमुळे दिलेल्या दणक्याने करी रोड पूल खुला झाला आहे.
करीरोड आणि एल्फिन्स्टन पुलावर पोलिसांनी एकेरी वाहतूक सुरू केल्याने वरळी, लोअर परळ, प्रभादेवी आदी भागातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत होती. या भागातील रुग्णांना केईएम, वाडिया, टाटा कॅन्सर रुग्णालय, ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करताना वाहतूक खोळंब्यामुळे त्रास सहन करावा लागत होता. वाहतूक कोंडीमध्ये एखाद्या रुग्णाचा जीव जाण्याचाही धोका होता. ही बाब लक्षात घेऊन लोकांच्या मनातील असंतोषाला शिवसेनेने वाट मोकळी करून दिली. शिवसेनेने भारतमाता सिग्नल ते करीरोड ब्रीजदरम्यान केलेल्या रास्ता रोकोच्या वेळी स्थानिक नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या आंदोलनात शिवसेना खासदार अरविंद सावंत, स्थानिक आमदार अजय चौधरी, माजी आमदार दगडू सकपाळ, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, उपविभागप्रमुख गजानन चव्हाण आदी सहभागी झाले होते. पोलिसांनी केलेल्या एकेरी वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी सोडवण्याऐवजी बिघडली होती. मॉल, फाईव्ह स्टार हॉटेल, लक्झरी टॉवर यांच्या सेवेसाठी पोलिसांनी सुरू केलेली एकेरी वाहतूक सर्वसामान्यांची कोंडी करणारी झाल्यामुळेच शिवसेनेने हे धडक आंदोलन केले, अशी माहिती उपविभागप्रमुख गजानन चव्हाण यांनी दिली.