मुंबई - सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये असणाऱ्या शवागाराचे तातडीने नूतनीकरण करण्याचा व त्या ठिकाणी ऑटोप्सी करण्यासाठी पात्र अशाच कर्मचाऱ्याला नेमण्याचा आदेश महाराष्ट्र सरकारने दिला आहे. मुंबईतील कुलाबा ॲडव्हान्स्ड लोकॅलिटी मॅनेजमेंट या नागरिकांच्या संस्थेच्या सदस्या रेणू कपूर यांनी ऑनलाइन प्रचार करून या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले होते, त्यावर राज्य सरकारने ही कारवाई केली आहे.
एप्रिलमध्ये 'ऑनचेंजडॉटओआरजी' या ऑनलाइन साईटवर या मागणीसाठी लोकांचे लक्ष वेधत जागरुकता निर्माण केली. येथे शवागार लहान असले तरी त्यात १० मृतदेह कोंबले जातात, त्या खोलीचे छत गळके आहे इत्यादी समस्यांकडे लक्ष वेधले होते. मुख्यमंत्री व कुटुंब कल्याण मंत्री यांना त्यांनी अर्जही करून ही मागणी केली होती. अखेर त्यांच्या याचिकेला सरकारच्या आदेशाने यश आले व त्या शवागाराच्या भीषणतेचा अंदाज रेणू कपूर यांनी मांडला. त्यांनी सांगितले की, गेल्यावर्षी एप्रिलमध्ये आपला चालक मनोज याचा मृत्यू झाल्यानंतर तेथे अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून त्याच्या शवाची उत्तरिय तपासणी करण्यात आली. मरणानंतरही त्या देहाचा मान राखला जात नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले व त्यामुळे हे शवागार व पोस्टमार्टेमचे ठिकाण हे नूतनीकृत केले जावे म्हणून आपण ही याचिका केली. कपूर यांच्या या ऑनलाइन याचिकेने मुंबईकरांच्या व्यथेला मांडले असून, वैद्यकीय व शिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रवीण शिणगारे यांनी ११ जून रोजी रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना ऑटोप्सी करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर नेमण्याचा आदेश दिला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी कपूर यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. १८ जूनपासून या संदर्भात कठोर कारवाई सुरू केली जाणार असून, पोस्टमार्टमसाठी अप्रशिक्षित किंवा अयोग्य अशा चतुर्थ श्रेणीमधील कर्मचाऱ्यांकडून हे काम करून घेताना आढळल्यास संबंधित डॉक्टरला निलंबित केले जाईल, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.