मुंबई - ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर जर कोण शरसंधान करणार असेल तर त्यांना उध्वस्त केल्याशिवाय गप्प बसायचं नाही. ही लढाई सोपी नाही परंतु ती लढल्याशिवाय गत्यंतर नाही आणि ही लढाई राष्ट्रवादी काँग्रेस लढल्याशिवाय थांबणार नाही’, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने आज संविधान वाचवा, देश वाचवा कार्यक्रमाचे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजन केले होते. या कार्यक्रमामध्ये शरद पवार यांनी सरकारला हा इशारा दिला. यावेळी बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोळवलकर यांनी लिहिलेल्या पुस्तकातील काही शब्दांबाबत शंका निर्माण करतानाच त्या पुस्तकामध्ये घटना ही इतर देशातून उचलून तयार केलेली आहे. ती परदेशाच्या विचारधारेवर आधारीत आहे. त्यामुळे ती आपली म्हणण्याचे कारणच नाही असे म्हटले आहे. याचा अर्थ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ घटना मानत नाहीत. त्यांचे इंग्रजीतील वाक्य शरद पवार यांनी वाचून दाखवले आणि त्याचा वरील मराठी अनुवाद सांगितला. हे सांगतानाच त्यांनी यासाठीच जागृत राहण्याची गरज आहे. आता जो आघात होणार आहे तो समाजातील वंचित, शोषित, दलित, अल्पसंख्यांक, ओबीसी, महिला यांच्यावर असणार असल्याचे सांगितले.