पालिका शाळांमध्ये संगीत अकादमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 June 2018

पालिका शाळांमध्ये संगीत अकादमी


मुंबई - महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पालिके ७ संगीत अकादमी केंद्रे नुकतीच सुरु करण्यात आली आहेत. या केंद्रांमध्ये भारतीय शास्त्रीय संगीत पद्धतीनुसार गायन व वादन तसेच कथ्थक, भरतनाट्यम व मोहिनीअट्टम या तीन नृत्य शैलींचे प्रशिक्षण या केंद्रांमध्ये दिले जाणार आहे. परेल येथील बारादेवी मनपा शाळेतील केंद्राचे उद्घाटन शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांच्या हस्ते करण्यात आले.

पालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी परिमंडळ निहाय संगीत अकादमी केंद्रे सुरु करण्याचे सूतोवाच पालिका आयुक्तांनी यंदाच्या अर्थसंकल्पीय भाषणात केले होते. त्यानुसार 7 ठिकाणी संगीत अकादमी केंद्रे सुरु करण्यात आली. ही केंद्रे भायखळा, परळ,सांताक्रूज, मालाड, चेंबूर, मुलुंड व कांदिवली येथे कार्यान्वित झाली आहेत. या सर्व केंद्रांमध्ये पारंपारिक वाद्यांसह अत्याधुनिक पद्धतीचे संगीत वाद्य संच देखील उपलब्ध करुन घेण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने संवादिनी (हार्मेानियम), तबला - डग्गा, इतर तालवाद्ये, खंजिरी,इलेक्ट्रॉनिक तानपुरा, इलेक्ट्रॉनिक तबला इत्यादींचा समावेश आहे. या संगीत अकादमी केंद्रांमध्ये 87 संगीत शिक्षकांद्वारे गायन, वादन व नृत्य इत्यादींचे प्रशिक्षण देणार आहेत.या प्रत्येक केंद्रामध्ये किमान 25 विद्यार्थी दाखल होतील, अशी अपेक्षा आहे. या विद्यार्थ्यांना सुरुवातीला गाणी, कविता इत्यादी 'लाईट म्युझिक'प्रकारातील प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांचा कल पाहून त्यांना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतानुरुप धडे दिले जाणार आहेत. विशेष म्हणजे या केंद्रांमध्ये प्रशिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांची नोंदणी अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाच्या परिक्षांसाठी देखील केली जाणार असून त्याचा सर्व खर्च महापालिकेद्वारेच केला जाणार आहे, अशी माहिती पालिकेचे शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दिली. 

दरम्यान, मनपा शाळांमधील ज्या विद्यार्थ्यांना संगीत अकादमी केंद्रामध्ये गायन, वादन वा नृत्य शिकण्यासाठी प्रवेश घ्यावयाचा असेल, त्या विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी त्यांच्या शाळेतील संगीत शिक्षक किंवा मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मनपा संगीत अकादमीच्या (संगीत विभाग) प्राचार्या सुवर्णा घैसास यांनी केले.

Post Bottom Ad