मुंबई - भाडेपट्टयाने देण्यात आलेल्या महापालिकेच्या स्थावर मालमत्तांच्या भाडेपट्याचे नुतनीकरण करण्याची सुस्पष्ट तरतूद करण्यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ७९ मध्ये नवीन परंतुक समाविष्ट करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
महानगरपालिकांच्या मालकीच्या स्थावर मालमत्ता विविध कालावधीसाठी भाडेपट्टयाने देण्यात आल्या आहेत. कलम ७९ (क) नुसार या मालमत्ता पट्टयाने देणे, विकणे, भाड्याने देणे किंवा अभिहस्तांतरित करणे या कार्यवाहींबाबत महापालिकेच्या मान्यतेने आयुक्त निर्णय घेऊ शकतात. मात्र, अशा मालमत्तांचा भाडेपट्टा संपल्यानंतर त्याचे नुतनीकरण करण्याची सुस्पष्ट तरतूद महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमात नसल्याने, त्यासाठी अधिनियमातील कलम ७९ मध्ये सुधारणा करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. नुतनीकरण करताना आकारण्यात येणारी भाडेपट्टयाची रक्कम अथवा प्रीमियम हे प्रचलित बाजारमुल्यांनुसार निर्धारित केलेल्या रकमेपेक्षा कमी असणार नाही. तसेच ते नुतनीकरणापूर्वीचे लगतचे भाडे अथवा प्रीमियम यापेक्षाही कमी नसेल असे या परंतुकात समाविष्ट करण्यात येणार आहे.