मुंबई / रत्नागिरी - रत्नागिरीतील आरेवारे समुद्रकिनारी पोहण्यासाठी गेलेले पाच पर्यटक रविवारी बुडाल्याची दुर्घटना घडली. सर्व पर्यटक मुंबईतील बोरिवली येथील आहेत.
बोरिवलीतील आयसी कॉलनीतील डिसोझा कुटुंबीय हे मुंबईहून गणपतीपुळेला फिरण्यासाठी गेले होते. गणपतीपुळेला जाण्याआधी त्यांना रत्नागिरीतील आरेवारे समुद्रात पोहण्याचा मोह झाला. सात पर्यटकांपैकी ५ जण समुद्रात उतरले. स्थानिक नागरिकांनी त्यांना समुद्रात उतरू नका असा सल्ला दिला. ज्या ठिकाणी तुम्ही पोहोयला उतरत आहात तो भाग अत्यंत खोल आहे, असे सांगूनही स्थानिकांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केल्याने पाचही जण बुडाले. खोल असलेल्या भागात ही घटना घडल्यामुळे शोधमोहीम राबवण्यात अडचणी येत होत्या. बुडालेल्या पर्यटकांची नावे केनेथ टिमोथी मास्टर्स (५६), मोनिका बेंटो डिसोझा (४४), सनी बेंटो डिसोझा (१९), मॅथ्यू बेंटो डिसोझा (१८) अशी असून हे सर्व होली क्रॉस रोड, शुभजीवन सर्कल, आयसी कॉलनी, बोरिवली, (पश्चिम), मुंबई येथे राहणारे आहेत. दरम्यान, या सात जणांपैकी रिटा डिसोझा (७०) आणि लिना केनेथ मास्टर्स (५२) या दोघींना वाचवण्यात यश आले आहे. या पर्यटकांनी स्थानिकांचा सल्ला ऐकला असता तर ही दुर्दैवी घटना टळली असती, अशी हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत..