नवी दिल्ली - रेल्वेचे जुने कोच, इंजिन, सिग्नल, जुन्या स्थानकांवरील उपकरणे तसेच वाफेवर चालणाऱ्या उपकरणांचे संवर्धन व नूतनीकरण करून ते पुन्हा वापरात आणण्याच्या योजनेवर विभागाकडून काम केले जात आहे. यासाठी या उपकरणांची माहिती असलेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेतले जाणार आहे.
निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्यासाठी प्रतिदिन १२०० रुपये इतके वेतन देण्याच्या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. रेल्वेकडे पडून असलेले जुने साहित्य, इंजिन, कोच यांचे नूतनीकरण करून ते पुन्हा वापरात आणण्याची रेल्वेची योजना आहे. जुन्या उपकरणांचे नूतनीकरण करणे हेे वाटते तितके सोपे नसून यासाठी अनुभवी हातांची गरज आहे. या कर्मचाऱ्यांना कंत्राटी तत्त्वावर कमाल सहा महिन्यांसाठी कामावर घेतले जाणार आहे. निवृत्त कर्मचाऱ्याचे कौशल्य आणि आरोग्याच्या परिस्थितीवरही यावेळी विचार केला जाईल. कामावर घेण्यासाठी निवृत्त कर्मचाऱ्याचे वय ६५ वर्षांपेक्षा जास्त नसावे ही अट मात्र असणार आहे. या कर्मचाऱ्यांना ओव्हरटाइम, प्रवास भत्ता असे लाभ मात्र मिळणार नाही, असेही बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. नूतनीकरण प्रक्रियेत सल्लामसलत आणि मार्गदर्शन करण्याचे पुरेसे कौशल्य असणाऱ्या दहा निवृत्त कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यास मुख्य विभागाला बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. यांची नियुक्ती रेल्वे म्युझियम, वर्कशॉप आणि इतर मेन्टेनन्स विभागावर नियुक्ती केली जाणार आहे. याशिवाय भारतीय रेल्वेशी निगडित सर्व महत्त्वाच्या कार्यक्रमांचे एक लॉगबुक सुरू करण्याचाही विचार बोर्डाकडून केला जात आहे.