मुंबई - राज्यात २३ जून पासून प्लास्टिक बंदी लागू केल्यानंतर शिवसेनेनेला पाचच दिवसात ही बंदी मागे घ्यावी लागली आहे. प्लास्टिक बंदी लागू केल्यानंतर त्याला पर्याय न देता बंदी लागू केल्याने सरकार व शिवसेनेवर मोठ्या प्रमाणात टिका करण्यात आली होती. तसेच सोशल मीडियावरून या निर्णयाची खिल्ली उडवली जात होती. त्यानंतर पाव किलोवरील किराणा मालाच्या पॅकिंगसाठी असलेली प्लास्टिकबंदी मागे घेण्याची घोषणा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली.
किरणा दुकानदारांच्या शिष्टमंडळाने प्लॅस्टिक पॅकिंगसाठी सूट मिळावी म्हणून शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. प्लॅस्टिक पॅकिंगविषयीच्या या प्रस्तावाबाबत आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यासह मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत किरणा दुकानांवरील प्लॅस्टिक पॅकिंगसाठी असलेली बंदी उठविण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही या निर्णयावर शिक्कामोर्तब केले असून याविषयीचे परिपत्रक लवकरच काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्लास्टिकबंदी मागे घेतली असली तरी नागरिकांना कॅरी बॅग वापरता येणार नाही. प्लास्टिक पिशव्या परत घेण्याची, त्या रस्त्यावर येणार नाहीत याची जबाबदारी व्यापाऱ्यांवर असणार आहे. दुकानदारांना धान्यासाठी कॅरी बॅग देता येणार नाही.