मुंबई - शनिवारपासून प्लास्टिक बंदी लागू होताच महापालिकांनी प्लास्टिकचा साठा आणि वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. ठाणे, पुणे, सातारा या ठिकाणी प्लास्टिकचा साठा करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. तर राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत मात्र शनिवार आणि रविवार दोन दिवस जनजागृती केली जाणार असून सोमवारपासून करावी केली जाणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आले आहे.
प्लास्टिक बंदीची राज्यभर अंमलबजावणी केली जात असताना राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत मात्र प्लास्टिक विरोधात कारवाई करण्यात आलेली नाही. पालिकेने नेमलेल्या २४९ निरीक्षकांनी महापालिका मुख्यालय ते महात्मा फुले मंडईपर्यंत रॅली काढली. या रॅलीनंतर विविध ठिकाणी मॉल, मंड्या, मोठ्या व्यापारी संस्थामध्ये जाऊन प्लास्टिकविरोधात जनजागृती केली. प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या असल्यास त्या प्लास्टिक संकलन केंद्रात जमा कराव्यात असे आवाहन यावेळी करण्यात आले. सोमवारपासून मुंबईभर धडक कारवाईस सुरुवात केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
ठाण्यामध्ये प्रदूषण विभागाच्या प्रमुख मनीषा प्रधान यांच्या नेतृत्वाखाली स्टेशन परिसर, बाजार, पोखरण रोड इत्यादी ठिकाणी कारवाई केली. या कारवाई दरम्यान भाजी मार्केटमधून २५०० किलो प्लास्टिक पकड्ण्यात आले असून ९५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. पुण्याच्या वनवाडी परिसरातील एका बेकरीमध्ये प्लास्टिकचा वापर होत असल्याने बेकरी विरोधात कारवाई करण्यात आली. पुणे शहरात कारवाई तीव्र केली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. सातारा येथे मोती चौक, रविवार पेठ, गुरूवार परज, पोवई नाका, मल्हारपेठ आदी ठिकाणी कारवाई करण्यात आली. चिकन सेंटर, मोमीन अॅण्ड सन्स, शू-किंग, कारंडे शू मार्ट, दुकानदार राजेंद्र बेंद्रे यांच्याविरोधात कारवाई कारवाई करत त्यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.