मुंबई - मुंबईमधील नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा मुंबई महापालिकेकडून करण्यात येत आहे. मात्र घाटकोपर पंत नगर येथील वल्लभबाग नाल्याचा भाग असलेल्या साईबाबा नाला अद्याप साफ करण्यात आला नसल्याची माहिती स्थानिक नगरसेविका व एन विभागाच्या प्रभाग समिती अध्यक्षा रुपाली आवळे यांनी दिली.हा नाला साफ न केल्याने घाटकोपरमधील पंत नगर विभागात पाणी साचण्याची भीती आवळे यांनी व्यक्त केली आहे.
मुंबईत पावसाळयाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल पासून नालेसफाई करण्यात येत आहे. नालेसफाई करण्याची डेडलाईन ३१ मे पर्यंत असते. या कालावधीत पालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाकडून कंत्राटदारांच्या माध्यमाने नालेसफाई करण्यात येते. नालेसफाई झाल्याचा दावा पालिकेकडून करण्यात येत आहे. मात्र पालिकेच्या घाटकोपर येथील एन विभागातील पंत नगर ९० फूट रस्त्याला लागून वल्लभबाग नाला आहे. या नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पालिकेने हाती घेतले आहे. या रुंदीकरणाचा भाग म्हणून काही अनधिकृत बांधकामे तोडण्यात आली. या नाल्यातील काही भाग साफ करण्यात आला. मात्र या नाल्याच्या मध्यभागी साईबाबा नगर आहे. या ठिकाणचा नाला साफ करण्यात आला नसल्याने पंत नगर विभागात पाणी साचणार असल्याचे आवळे यांनी सांगितले. नालेसफाई होत नसल्याने एन विभागाच्या सहाय्यक आयुक्त भाग्यश्री कापसे, उपायुक्त रणजित ढाकणे यांची भेट घेऊन तक्रार केली. त्यांनी पर्जन्य जल वाहिन्यांच्या अधिकाऱ्यांना बोलावून नाले साफ करण्याच्या सूचना दिल्या. मात्र त्यानंतरही नाला साफ होत नसल्याने पालिका आयुक्तांची भेट घेऊन नालेसफाई होत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आणण्यात आले. मात्र त्यानंतरही जून महिना उजाडला तरी अद्याप नालेसफाई झाली नसल्याचे आवळे यांनी सांगितले. दरम्यान याबाबत पर्जन्य जलवाहिन्या विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असता संपर्क होऊ शकलेला नाही.