मुंबई - मुंबईच्या कफ परेड येथील समुद्रात भराव टाकून सेंट्रल पार्क बनवण्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विरोध आहे. त्यासाठी गुरुवारी पक्षाच्या वतीने मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात मोर्चा काढण्यात आला.
मुंबई महापालिकेने प्रारूप विकास आराखडयात कफ परेड येथील समुद्रात १२१ हेक्टर क्षेत्रफळावर मातीचा भराव टाकून सेंट्रल पार्क तयार केले जाणार आहे. समुद्रात भराव टाकल्याने मुंबईला भविष्यात सुनामीच्या धोक्यास सामोरे जावे लागणार असल्याने मुंबईकरांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे. समुद्रात भराव टाकण्यास कोळी बांधवांचाही विरोध आहे. समुद्रात भराव टाकल्याने त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे सचिन अहिर यांनी सांगितले. २००५ साली मुंबईत झालेल्या अतिवृष्टीने जी वाताहत झाली होती तो प्रसंग अजून मुंबईकर विसरलेले नाहीत. आज जरासा पाऊस पडला तरी मुंबई जलमय होते. मग अशा प्रकारे मुंबईतील समुद्रात भराव टाकून समुद्र बुजविणे म्हणजे मुंबईत सुनामीला आमंत्रण देण्यासारखे असल्याचे त्यांनी सांगितले. या विषयावर राष्ट्रवादी पक्ष गंभीर असून याबाबत स्थायी समिती अध्यक्ष यांनाही निवेदन देऊन सदर प्रस्ताव रद्द करण्याची मागणी करणार असल्याचे पालिकेतील गटनेत्या राखी जाधव यांनी सांगितले. मेट्रो प्रकल्पातून निघणारी माती समुद्रात टाकण्याऐवजी ती माती ज्या ठिकाणी डोंगर पोखरले आहेत त्या ठिकाणी टाकावी अशी मागणी जाधव यांनी केली.