गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 June 2018

गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा

मुंबई - मुंबईत ९ जून या एकाच दिवशी जोरदार पाऊस पडला. मात्र त्यांनतर पावसाने पाठ फिरवली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलाव क्षेत्रातही अपेक्षित पाऊस पडलेला नसल्याने तलावांत सध्या शिल्लक असलेला पाणीसाठा हा गेल्यावर्षीच्या पाणीसाठ्यापेक्षाही कमी असल्याचे पालिकेच्या दैनंदिन पाणी अहवालातून समोर आले आहे.

मान्सूनच्या पहिल्याच पावसाने मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरात दमदार हजेरी लावली. मात्र याचवेळी पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रांत पावसाच्या तुरळक सरी पडल्या. येथे अजूनही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये सध्या २,३९,२०१ दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा पुढील ६१ दिवस पुरेल इतका आहे. मात्र गतवर्षी याच तलावांत २,६८,४०३ दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे या तुलनेत यंदा २९,२०२ दशलक्ष लिटर इतका म्हणजे ७ दिवसांचा पाणीसाठा कमी आहे.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा तलावांत १२ जून रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत शून्य दशलक्ष लिटर, मोडक सागर तलावात - ५५,७३७ दशलक्ष लिटर, तानसा - २१,१०३ दशलक्ष लिटर, मध्य वैतरणा - ७१,०१४ दशलक्ष लिटर, भातसा - ८२, ६९३ दशलक्ष लिटर, विहार - ५,९४९ दशलक्ष लिटर, तुळशी - २,५०५ दशलक्ष लिटर इतका म्हणजे एकूण २,३९,२०१ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा शिल्लक आहे. ७ जून रोजी याच सात तलावांत एकूण २,५६,१०१ दशलक्ष लिटर म्हणजे पुढील ६५ दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे १२ जून पर्यंत १६,९०० दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा कमी झाला आहे.

Post Bottom Ad