मुंबई - महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या प्रश्नांविषयक संशोधन व कार्यशाळांसाठी आर्थिक सहाय्य वितरित करीत असून यासाठी पात्र संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. याबाबतची अधिक माहिती आयोगाच्या www.mscw.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र राज्य महिला आयोग स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी, स्त्रियांचा समाजातील दर्जा, प्रतिष्ठा सुधारणे व उंचावणे तसेच त्यांच्या न्याय हक्कांसाठी कार्यरत आहे. त्या अनुषंगाने महिलांविषयक संशोधनासाठी व कार्यशाळांसाठी शैक्षणिक संस्था/सामाजिक संस्था/संशोधन संस्था यांना आर्थिक सहाय्य वितरित करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर संशोधन प्रकल्प, चर्चासत्र/शिबिरे/कार्यशाळा यांचे प्रस्ताव सादर करण्याचा नमुना व सविस्तर माहिती महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे संकेतस्थळ www.mscw.org.in वर उपलब्ध आहे. इच्छुकांनी विवाहित नमुन्यातील प्रस्ताव दि ३०/०६/२०१८ पर्यंत आयोग कार्यालयात प्राप्त होतील असे पाठवावे.
याबाबत बोलताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर म्हणाल्या, आर्थिक वर्ष २०१६-१७ करीत आयोगाकडून राज्यभरातील १९२ संस्थांनाचर्चासत्र/शिबिरे/कार्यशाळाकरीता व ४५ संस्थांना संशोधनाकरिता एकूण रु १ कोटी ५८ लाख आर्थिक सहाय्य करण्यात आले. यातुन महिलांमध्ये कायदेविषयक तसेच आर्थिक साक्षरता, कौटुंबिक न्यायालयातील समुपदेशन दर्जा, मुस्लिम महिलांचे प्रश्न, एकल महिला, आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला, महिला आणि मानसिक तणाव आदी विषयांवर सखोल संशोधन करण्यात आले आहे. आता या माध्यमातून अधिकाधिक संस्थांनी पुढे येऊन महिलांविषयक प्रश्नांवर संशोधन करावे असे आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले आहे.