मुंबई - मुंबईत सातत्याने आगी लागण्याच्या घटना घडतात. अशा घटना घडल्यास गृहनिर्माण सोसायट्या, व्यावसायिक इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणा बसवली असल्यास आग विझवणे सोपे जाते. मात्र अद्यापही अशी यंत्रणा बसवण्याकडे दुर्लक्ष केले गेले आहे. नादुरुस्त व कालबाह्य झालेल्या यंत्रणा अद्याप दुरुस्त किंवा बदलण्यात आलेल्या नाहीत असे निदर्शनास आले आहे.
वाढत्या आगीच्या घटनांनंतर काही महिन्यांपूर्वी अग्निशमन यंत्रणेकडून तपासण्यात आलेल्या सुमारे चार हजार इमारतीत अग्निशमन यंत्रणा फेल असल्याचे निदर्शनास आले होते. प्रशासनाने अशा यंत्रणा दुरुस्त व नव्याने बसवण्यासाठी सूचना केल्या. अग्निशमन यंत्रणा व त्यासंबंधित नियम धाब्यावर बसवणाऱ्या सोसायट्या, व्यावसायिकांवर पालिकेने कारवाईही केली. त्यानंतर काही सोसायट्यांनी यंत्रणा बसवली. मात्र अजूनही बहुतांशी सोसायट्या, व्यावसायिकांनी यंत्रणा बसवण्यास दुर्लक्ष केले आहे. अशा सोसायट्यांना प्रशासनाने नोटिसा पाठवून कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तरीही टाळाटाळ केल्यास अशांवर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. नियमानुसार दरवर्षी अग्निशमन यंत्रणा ऑडिट करून संबंधित विभागाकडे जमा करणे आवश्यक आहे. मात्र अनेक सोसायट्या याकडे लक्ष देत नाहीत. यंत्रणेची तपासणी करणे सोसायट्यांना, व्यावसायिकांना बंधनकारक आहे. मात्र हे होत नसल्याने अग्निशमन दलाने अशांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे..