मुंबई - पर्यावरणाचे महत्त्व पटविण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये वाढत्या प्रदूषणाला रोखण्यासाठी पर्यावरणाविषयी जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न शालेय अभ्यासक्रमातून केला जात आहे. या वर्षापासून आठवी आणि दहावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमामध्ये पर्यावरणावर दोन स्वतंत्र धड्यांचा समावेश करण्यात आला असून त्यातून पर्यावरण संतुलन राखण्यावर भर देण्यात आला आहे.
घराघरामध्ये पर्यावरण संतुलनाचे महत्त्व, माहिती घराघरात पोहोचावी, पर्यावरणाबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी राज्य शासनाने इयत्ता आठवी आणि दहावीच्या पुस्तकात संतुलित पर्यावरणाचे महत्त्व विशद करणारे धडे समाविष्ट केले आहेत. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे शाळेपासूनच विद्यार्थ्यांना संतुलित पर्यावरणाचे महत्त्व समजण्यास मदत होणार आहे.
आठवीच्या अभ्यासक्रमात ‘प्रदूषण’ आणि ‘इको सिस्टीम’ असे दोन धडे अंतर्भूत करण्यात आले आहेत. प्रदूषण या धड्यात प्रदूषण, त्याचे प्रकार, प्रदूषणाची निर्मिती, याबरोबरच वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या उपायांबाबत माहिती देण्यात आली आहे. याच धड्यात कचऱ्याचे ओला आणि सुका कचरा असे वर्गीकरण करणे कसे आवश्यक आहे, टाकाऊ, टिकाऊ आणि प्रदूषणकारक वस्तू यांचीही माहिती या धड्यात आहे. आज हवेमुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणीय असंतुलन होते अशा वेळी हवा गुणवत्ता निर्देशांक, आम्लवर्षा, आणि प्रदूषण अधिनियम आणि कायदे यांची माहिती या धड्यात देण्यात आली आहे. तर दुसरा धडा हा पूर्णपूणे ‘इको सिस्टीम’ वर आधारित आहे. सध्याची स्थिती, वेगवेगळे प्रकार आणि वेळोवेळी करण्यात आलेले सर्वेक्षण, बदलेली स्थिती जसे वाढते औद्योगिकीकरण, नागरीकरण, शहरीकरण, वाढत गेलेले पर्यटन, लोकसंख्यावाढ, संसाधनाचा वाढलेला वापर यामुळे इकोसिस्टीम कशी आहे याबाबत सर्व माहिती देण्यात आली आहे.
दहावीच्या अभ्यासक्रमात विज्ञान आणि तंत्रज्ञान याविषयामध्ये दोन स्वतंत्र धडे पर्यावरणावर आहेत. तसेच आपत्ती व्यवस्थापनामध्ये सुद्धा पर्यावरणामुळे निर्माण झालेली आपत्ती याबाबत माहिती देण्यात आली आहे. दहावीच्या अभ्यासक्रमामधील पर्यावरणावर आधारित हरित ऊर्जेच्या दिशेने आणि पर्यावरणीय व्यवस्थापन असे दोन धडे पर्यावरणावर देण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपत्ती येण्याचे वेगवेगळे प्रकार, आपत्कालीन कृती,आपत्ती निवारण कक्षाचे महत्व, मॉकड्रिल्सबरोबरच प्रथमोपचाराचे महत्त्व देण्यात आले आहे.
पर्यावरणीय व्यवस्थापन या धड्यामध्ये पर्यावरणाचे संतुलन, विद्यार्थ्यांची भूमिका असणे अपेक्षित आहे याबरोबरच जैवविविधता याविषयी सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व समजावून सांगताना काही उदाहरणे देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ‘देवराई पॅटर्न’ नेमका काय आहे हे सांगण्यात आले आहे. दहावीच्या हरित ऊर्जेच्या दिशेने या धड्यात ऊर्जा निर्मिती, हरित ऊर्जा निर्माण करणे नेमके कसे शक्य आहे यासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग कसा आवश्यक आहे याबाबत माहिती देण्यात आली आहे. याशिवाय सूक्ष्म जीवशास्त्राची ओळख करीत असताना दैनंदिन जीवनातील भूमिका, सांडपाणी व्यवस्थापनाचे महत्त्व, स्वच्छ तंत्रज्ञानाबद्दल माहिती आहे.
पर्यावरणाबाबत समाजामध्ये अनेक समज-गैरसमज आहेत. संतुलित पर्यावरण राखण्यासाठी राज्य शासन वेगवेगळ्या मोहिमा हाती घेत असले तरी याबाबत लोकसहभाग वाढवणेही आवश्यक आहे. संतुलित पर्यावरण, वाढत जाणारे प्रदूषण रोखण्यासाठी काय करणे आवश्यक आहे, यामध्ये लोकसहभाग आणि जनजागृती किती महत्त्वाची आहे याबाबतची माहिती शालेय स्तरावरुनच विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे आणि म्हणूनच दहावीच्या अभ्यासक्रमात पर्यावरण हा विषय समाविष्ट करण्यात आला आहे.