मुंबई - इंग्रजीतल्या विकास आराखड्यावरून आज पालिका सभागृहात वाद रंगल्यानंतर बुधवारी पुन्हा स्थायी समितीत यावर खडाजंगी झाली. यावरील चर्चा पालिका आयुक्तांच्या उपस्थित व्हायला हवी, अशी मागणी शिवसेनेने केली. त्यामुळे या वादावर आता पालिका आयुक्तांच्या उपस्थित चर्चा केली जाणार आहे.
राज्य सरकारने विकास आराखडा मंजूर केल्यानंतर त्याची प्रत इंग्रजीत देणे हा मराठी भाषेचा अपमान आहे. राज्य सरकारचाच आदेश आहे, की कामकाज मराठीतच झाले पाहिजे. तरीही राज्य सरकारच मराठीचा अपमान करत आहे. नगरसेवकांनी केलेल्या सूचना हरकतीपैकी निम्म्याही सूचनांचा विचार करण्यात आलेला नाही. सूचना, हरकतीबाबत पालिका आयुक्तांना माहिती असताना त्यांनी याबाबत दुर्लक्ष का केले, असा सवालही यावेळी शिवसेनेने विचारला. स्थायी समितीत विकास आराखड्याच्या छायांकित प्रतिबाबत निविदा काढण्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत मांडला गेला यावर शिवसेनेने तीव्र आक्षेप घेत इंग्रजीत विकास आराखडा प्रसिध्द करण्यात आाला. शिवाय यांत नगरसेवकांच्या निम्म्याहून अधिक सूचना - हरकतीचा विचार न करता आराखडा प्रसिद्ध करण्यात आला. याबाबत आयुक्तांनीच खुलासा करावा अशी मागणी केली. यावर पुन्हा सभा बोलावून आयुक्तांच्या उपस्थितीत याबाबत चर्चा व्हावी, तोपर्यंत या संदर्भातील प्रस्ताव मंजूर करू नये अशी मागणी केली. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनीही या मागणीला दुजोरा दिला. त्य़ामुळे आता पुन्हा यावर चर्चा रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.