मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली कामे, घेतलेले निर्णय नागरिकांपर्यंत पोहचवण्याचे काम मुख्यमंत्री कार्यालय करते. मात्र गेल्या काही दिवसात या कार्यालयाकडून मुख्यमंत्री पक्ष कामासाठी कोणते दौरे करणार, कोणत्या प्रचार सभांना हजार राहणार याचीही माहिती दिली जात आहे. यामुळे हे मुख्यमंत्री कार्यालय आहे की भाजपाचे पक्ष कार्यालय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नुकत्याच पालघर आणि भंडारा-गोंदीया या दोन लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूका झाल्या. या दोन्ही ठिकाणी १९ मे, २४ मे, २५ मे या कालावधीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रचारासाठी हजर राहणार होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांचा राजकीय पक्ष असलेल्या म्हणजेच भाजपाच्या पक्षिय कामकाजासाठी जाणार होते. त्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाऐवजी भाजपाच्या प्रदेश कार्यालयाकडून येणे अपेक्षित होते. परंतु, राजकीय पक्षाच्या प्रचाराला मुख्यमंत्री हजार राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली. याशिवाय आज ४ जून २०१८ रोजी मुख्यमंत्री फडणवीस हे भाजपच्या प्रदेश कार्यकारणीच्या अर्थात पक्षिय कामकाजासाठी दादर येथील वसंत स्मृती येथे उपस्थित राहिले. याची माहितीही भाजपाच्या प्रदेश कार्यालयाकडून येणे अपेक्षित होते. मात्र याचीही माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली. त्यामुळे सरकारी यंत्रणेचा भाग असलेले मुख्यमंत्री कार्यालय हे आता भाजपाचे कार्यालय झाल्याची चर्चा मंत्रालयात सुरु झाली आहे.