पालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्यास मंजुरी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 June 2018

पालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्यास मंजुरी


मुंबई - मुंबईतील शाळांमधून विद्यार्थ्यांसोबत अनेकवेळा गैरप्रकार केले जातात. असे प्रकार रोखण्यासाठी पालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी मागील वर्षी शिक्षण समितीत करण्यात आली होती. त्या अनुषंगाने पालिकेच्या शिक्षण विभागाने शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्यास मंजुरी दिली आहे. लववकरच पालिका शाळांमधून 4 ते 5 हजार सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत.

दोन वर्षापूर्वी दादर येथील शाळेत नऊ वर्षांच्या मुलीवर 19 वर्षांच्या कंत्राटी कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केला होता. गेल्या वर्षी गुरुग्राम येथील रायन इंटरनॅशनल शाळेत विद्यार्थ्याची हत्या झाली होती. या घटनांच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या शिक्षण समितीत नगरसेविका सईदा खान यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करत पालिकेच्या शाळांमधून सीसीटीव्ही लावण्याची मागणी केली होती. ही मागणी करताना महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे 417 शाळा चालविण्यात येतात. त्यात 227 शाळा या भाडेतत्त्वावरील इमारतींत भरवल्या जातात. तसेच मालमत्ता विभागाच्या 33 शाळा आहेत. तर बिगर भाडेतत्त्वावर 24 अशा एकूण 701 शाळांच्या इमारती पालिकेच्या अखत्यारीत येत आहेत. यात जवळपास 3 लाख 46 हजार 742 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्वच शाळांमध्ये सीसीटीव्ही नसल्याची बाब धक्कादायक आहे. पालक विश्वासाने मुलांना शाळांमध्ये सोडतात. पण, इथे विद्यार्थी सुरक्षित आहेत की नाही, याविषयी प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले असल्याने खान यांनी सीसीटीव्ही लावण्याची मागणी केली. तर महापालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पाठवताना पालक तणावात असतात. हे लक्षात घेऊन महापालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवावेत, असे पत्र शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे यांनी तत्कालीन समिती अध्यक्षा शुभदा गुडेकर यांना दिले होते. यावर महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही लावणे आवश्यक असून प्रशासनाने हे कॅमेरे याच आर्थिक वर्षात बसवावेत अशा सूचना शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुडेकर यांनी प्रशासनाला केल्या होत्या. कॅमेरे प्रत्येक शाळांमध्ये बसवताना ते वर्गनिहाय बसवावेत की प्रवेशद्वारांवर याचाही अहवाल त्वरीत तयार करण्याची सूचना केली होती. यानुसार प्रशासनाने विद्यार्थी, शिक्षक, शालेय परिसर, इमारत व शाळांमधील साधन सामुग्री असामाजिक तत्त्वांपासून व समाजकंटकांपासून सुरक्षित राहावी म्हणून सीसीटीव्ही लावण्यासाठी सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. लवकरच प्रशाकीय मंजुरी मिळाल्यावर निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. सीसीटीव्ही लावण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असल्याने निविदा काढून शाळांमध्ये लवकरच सीसीटीव्ही लावले जातील असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान महापालिका शाळांमधून 4 ते 5 हजार सीसीटीव्ही लावले जाणार असून हे कॅमेरे शैक्षणिक वर्ष सुरु होण्याआधी बसवावेत अशी मागणी सईदा खान यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे.

Post Bottom Ad