मुंबई - बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांच्या मनमानी कारभाराचे पडसाद पालिका गटनेत्यांच्या बैठकीत उमटले. सोमवारी झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांनी महाव्यस्थापकांच्या मनमानी कारभाराकडे पालिका आयुक्त अजोय मेहता यांचे लक्ष वेधले. मात्र, पालिका आयुक्त मेहता यांनी यासंदर्भात आपण स्वत: बागडे यांच्याशी बोलू, असे सांगत या वादावर पडदा टाकला.
बेस्ट उपक्रमातील माहिती व तंत्रज्ञानाशी संबंधित विषयांकरिता मे. अर्नेस्ट अँड यंग एलएलपी या व्यवसाय संस्थेशी सल्लागार म्हणून नेमणूक करून बागडे यांनी निविदा प्रक्रियेचे उल्लंघन करून मनमानी करत स्वत:च्या अधिकाराचा गैरवापर करत कंत्राट दिल्याचा आरोप चेंबूरकर यांनी केला. तसेच मे. ट्रायमॅक्स आयटी इन्फ्रास्ट्रक्चर अँड स्व्हिहसेस प्रा.लि. या व्यवसाय संस्थेला दिलेला कंत्राट कालावधी विस्तारित करण्याबाबत उपसमितीने सादर केलेला अहवाल बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी अमान्य केला. इतकेच नाही तर मंजूर झालेला बेस्ट समितीचा ठराव रद्दबातल करण्यासाठी पालिका आयुक्तांना पत्र लिहिले. या संपूर्ण प्रक्रियेत बेस्ट समितीला पूर्णपणे डावलण्यात आल्याचा आरोप आशिष चेंबूरकर यांनी गटनेत्यांच्या बैठकीत केला. यावर पालिका आयुक्तांनीही महाव्यवस्थापकांच्या पत्राची त्वरित दखल घेत हा प्रस्ताव रद्द करण्याची विनंती नगरविकास खात्याकडे पत्राद्वारे केली असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले..