मुंबई - शासकीय आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहातील निवासी तसेच स्थानिक अनिवासी विद्यार्थी अथवा विद्यार्थिनींचा आश्रमशाळेत शिक्षण घेत असताना नैसर्गिक आपत्ती, अपघाती, अथवा आवाक्याबाहेरील कारणामुळे मृत्यू झाल्यास त्यांच्या पालकांना दोन लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी दिली.
सवरा यांनी सांगितले, शासकीय आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहातील अपघाती मृत्यू होणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या पालकांना अनुकंपा म्हणून देण्यात येणाऱ्या सानुग्रह अनुदानाची रक्कम वाढवावी, अशी मागणी लोकप्रतिनिधींकडून केली जात होती. आतापर्यंत ही रक्कम 75 हजार रुपये एवढी होती. ती कमी असल्याने वाढ करुन दोन लाख रुपये एवढी करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. अनुदानित आश्रमशाळा व नामांकित शाळांमध्ये अशा घटना घडल्यास 50 टक्के शासनातर्फे व 50 टक्के संबंधित संस्थेतर्फे देण्यात येणार असल्याचे सवरा यांनी सांगितले.