वल्लभबाग नाला रुंदीकरणामुळे घाटकोपरमधील पाण्याचा निचरा लवकर होणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 May 2018

वल्लभबाग नाला रुंदीकरणामुळे घाटकोपरमधील पाण्याचा निचरा लवकर होणार

मुंबई - मुंबईतील घाटकोपर परिसरात वल्लभबाग नाल्याच्या आड येणा-या बांधकामांवर पालिकेने कारवाई केली. या कारवाईमुळे परिसरातील पंतनगर, हिंगवाला लेन, साईबाबा नगर, नायडू कॉलनी, महात्मा फुले नगर इत्यादी परिसरातील पावसाच्या पाण्याचा निचरा प्रभावीपणे होईल, अशी माहिती 'एन' विभागाच्या सहाय्यक आयुक्त डॉ. भाग्यश्री कापसे यांनी दिली.

परिसरातील पावसाच्या पाण्याचा अधिक प्रभावीपणे निचरा होण्यासाठी वल्लभ-बाग नाल्याचे रुंदीकरण करणे आवश्यक होते. मात्र, विविध तांत्रिक व कायदेशीर प्रक्रियांमुळे हे काम सुरु होण्यास अडचणी येत होत्या. याबाबत न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निकाल दिल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून सदर बांधकामे हटविण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. बांधकामे हटविण्यात आल्यानंतर लगेचच तेवढ्या भागातील नाल्याच्या रुंदीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. यानुसार नाल्याच्या ९६० मीटर लांबीपैकी सुमारे २७५ मीटरचे काम पावसाळ्यापूर्वी तर उर्वरित काम पावसाळ्यानंतर करण्यात येणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर घाटकोपर परिसरातील पंत नगर, हिंगवाला लेन, साईबाबा नगर, नायडू कॉलनी, महात्मा फुले नगर इत्यादी परिसरातील पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक प्रभावीपणे होईल, असे सहाय्यक आयुक्त डॉ. कापसे यांनी सांगितले.

या परिसरात संततधार पावसाच्या वेळी पंत नगर, हिंगवाला लेन, साईबाबा नगर, नायडू कॉलनी, महात्मा फुले नगर या भागांमध्ये पावसाच्या पाण्याचा निचरा संथ गतीने होत असल्याचे पालिका प्रशासनाला आढळून आल्यानंतर या परिसरातील पाणलोट क्षेत्राचा व पाणी वाहून नेणा-या नाल्यांचा अभ्यास महापालिकेच्या पर्जन्यजल वाहिन्या खात्याने केला. या अभ्यासाअंती घाटकोपर परिसरातील ९६० मीटर लांबीचा व सुमारे दीड ते दोन मीटर एवढी रुंदी असलेल्या वल्लभबाग नाल्याचे पात्र अरुंद असल्याचे लक्षात आले. तसेच हा नाला पुढे जाऊन संजय गांधी नगर मधील ज्या लक्ष्मीबाग नाल्याला मिळतो, तिथे नाल्याचे पात्र अतिशय निमुळते झाल्याचेही निदर्शनास आले होते. या सर्व बाबी लक्षात घेऊन हा नाला ३ मीटरपर्यंत रुंद करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला. मात्र या नाल्याच्या दोन्ही बाजूला असणा-या ८२० बांधकामांमुळे नाल्याच्या रुंदीकरणाचे काम प्रत्यक्ष हाती घेण्यास अडथळे येत होते. सदर नाल्याच्या दोन्ही बाजूला असणारी बांधकामे व तेथील रहिवाशांनी न्यायालयात दाखल केलेल्या खटल्याबाबत न्यायालयाने २२ जानेवारी २०१८ रोजी महापालिकेच्या बाजूने निकाल दिल्यानंतर प्रत्यक्ष कार्यवाहीस सुरुवात झाली. यानुसार आतापर्यंत १९३ बांधकामे निष्कासित करण्यात आली आहेत. यानंतर सुमारे २७५ मीटर लांबीच्या नाल्याचे विस्तारीकरण हाती घेण्यात आले आहे. यापैकी १६५ मीटरचे विस्तारीकरण आतापर्यंत पूर्ण झाले आहे, तर उर्वरित सुमारे ११० मीटर लांबीच्या नाल्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. तसेच या पावसाळ्यानंतर सुमारे ६८५ मीटर लांबीच्या नाल्याच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण होईल, असेही कापसे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad