मुंबई - मालाड कुरार व्हिलेज येथील पोयसर नदीच्या रुंदीकरणाअंतर्गत बाधित होणाऱ्या १५० प्रकल्पबाधितांनी पुनर्वसनाच्या मागणीसाठी तसेच त्यांच्यावर पालिकेकडून होत असलेल्या अन्यायाचा निषेध करण्यासाठी मंगळवारी आझाद मैदानात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्याताई चव्हाण व पालिकेतील गटनेत्या राखी जाधव यांच्या नेतृत्वाखाली हल्लाबोल आंदोलन केले.
कुरार गाव, अप्पापाडा येथील पोयसर नदीच्या रुंदीकरणाचे काम पालिका प्रशासनाने हाती घेतले आहे. त्यासाठी पालिकेने दोन वर्षांपूर्वी या प्रकल्पाअंतर्गत बाधित अप्पापाडा, देवकी पाडा, पटेल कंपाउंड, सईबाई नगर, गोकुळ नगर, आनंद नगर, गांधी नगर येथील १५० घरांचे सर्वेक्षण केले. नागरिकांकडून पुरावे गोळा केले, घरांना नोटिसा दिल्या. तसेच या प्रकल्पबाधितांना शासन निर्णयाप्रमाणे २६९चौरस फुटांची घरे न देता त्यांना अवघ्या २२५ फुटांचे घर देऊ केले. प्रकल्पबाधितांना न काळविता त्यांच्या गैरहजेरीत पालिकेने १८ मे रोजी लॉटरी काढली, असा आरोप या प्रकल्पबाधितांनी केला. पालिका ४ किलोमीटर परिसरात योग्य घर देत नसल्याने पालिका आमच्यावर अन्याय करीत असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला. २२५ चौरस फुटांऐवजी एमएमआरडीएची २६९ चौरस फुटांची घरे पावसाळ्यापूर्वी देण्यात यावीत, कुरार भागातच प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करण्यात यावे, शासन निर्णयानुसार पर्यायी घरे उपलब्ध न करणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱयांवर कारवाई करण्यात यावी या मागण्यांचे निवेदन पालिका आयुक्तांना यावेळी देण्यात आले. दरम्यान या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन अभ्यास करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल,असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
No comments:
Post a Comment