मुंबई - पावसाळा तोंडावर आला असताना मुंबई महापालिकेला एका महिन्यात फक्त २५ टक्के नाले सफाई करण्यात यश आले आहे. नालेसफाई योग्यरित्या होत नसल्याने पालिका आयुक्तांच्या मासिक आढाव बैठकीरत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेण्यात येणार आहे. यामुळे पालिका अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली असली तरी महिनाभरात म्हणावी तशी नालेसफाई झालेली नाही. याबाबत नगरसेवकांशी संपर्क साधला असता अनेक नगरसेवकांनी नालेसफाईच्या कामांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. छोट्या नाल्यांच्या सफाईसाठी अद्यापही कंत्राटदार मिळाले नसल्याने सफाईचे काम सुरु नसल्याचे म्हटले आहे. एनजीओची माणसे काही ठिकाणी उपलब्ध करण्यात आली असली तरी त्याची संख्या कमी असल्याने नालेसफाई होणार कशी असा प्रश्न नगरसवेकांनी उपस्थित केला आहे. तसेच काही ठिकाणी गटारांच्या बाजूला टाकण्यात आलेला कचरा रस्त्यावर आठ - आठ दिवस पडून असल्याने नागरिकांचा रोषाला सामोरे जावे लागत आहे. मुंबईतील नालेसफाई १८ ते २० टक्केच झाली आहे. पालिका नालेसफाईवर खर्च करत नसून कंत्राटदारांवर खर्च करत आहे. पाणी साचू नये म्हणून पंप लावले जातात, त्यासाठी आधी १७ कोटी खर्च होत होता. आता हा खर्च ५४ कोटी पर्यंत पोहचला आहे. नालेसफाई समाधानकारक होत नाही. मेट्रोच्या कामांमुळे रस्ते खराब झाले आहेत. याचा त्रास मुंबईकरांना होणार आहे. मेट्रोच्या कामांमुळे मुंबईकरांना त्रास होणार असल्याची भीती खुद्द पालिका आयुक्तांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे मुंबई यावर्षीही तुंबण्याची शक्यता पालिकेचे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी व्यक्त केली आहे. मुंबई तुंबणार नाही असे आश्वासन आयुक्तांनी मुंबईकरांना द्यावे असे आवाहन रवी राजा यांनी केले आहे. यावर नाले सफाई २५ ते 30 टक्के झाली आहे. ही कामे वेगाने सुरू आहेत. सफाई कामाचा लोड वाढला आहे. त्यामुळे हायवेवर गाळ नेणाऱ्या गाड्यांच्या रांगा लागल्या आहेत. वजनकाट्यांची संख्या कमी असल्याने कांदिवली येथील बालाजी काटा व पूर्व द्रुत गती मार्गावर माणकोली येथे हे दोन नवीन वजन काटे सुरु केले जाणार आहेत. वजनकाट्यांची अडचण दूर होताच सर्व सुरळीत होईल अशी माहिती पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे प्रमुख अभियंता विद्याधर खणखर यांनी दिली आहे. दरम्यान पर्जन्य जलवाहिन्या विभागाने ठरल्यावेळेत नालेसफाई पूर्ण अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र एक महिन्यात फक्त २५ टक्केच नालेसफाई झाल्याने पालिका आयुक्त अधिकाऱ्यांची झाडाझडती घेणार असल्याचे समजते.
No comments:
Post a Comment