मुंबई । जेपीएन न्यूज -
देशभरातील जनता पेट्रोल, डिझेलच्या भरमसाठ दरवाढीमुळे त्रस्त झाली आहे. पेट्रोल, डिझेलच्या किंमती आटोक्यात आणाव्यात म्हणून पेट्रोलियम पदार्थ जीएसटी अंतर्गत आणावे आणि पेट्रोल व डिझेलवर जो मोठ्या प्रमाणात अनावश्यक कर लादलेला आहे, तो कमी करावा, या मागणीकरिता सरकारवर दबाव आणण्यासाठी गुरुवारी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली कलिना हायवे ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. यावेळी जे पर्यंत पेट्रोलियम पदार्थ जीएसटी अंतर्गत सरकार आणत नाही तो पर्यंत रस्त्यावर उतरून सतत आंदोलन करू असा इशारा निरुपम यांनी यावेळी दिला.
यावेळी संजय निरुपम पुढे म्हणाले की, २०१२ मध्ये पेट्रोलचा भाव ७३ रुपये प्रति लिटर होता. त्यावेळी कच्च्या तेलाची किंमत १४८ डॉलर प्रति बॅरल इतकी होती. त्यावेळेस सुप्रसिद्ध सिने अभिनेते अमिताभ बच्चन म्हणाले होते, की पेट्रोलचा दर इतका वाढला आहे. की पेट्रोल विकत घेण्यापेक्षा गाडी जाळून टाकावी असे वाटते. आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत ७५ डॉलर प्रति बॅरल असताना सुद्धा पेट्रोलची किंमत ८५ रुपये प्रति लिटर आहे. आज २०१८ मध्ये पेट्रोलचा दर इतका वाढलेला असताना अमिताभ बच्चन भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाब विचारणार का? आज अमिताभ बच्चन गप्प का असा प्रश्न निरुपम यांनी उपस्थित केला.
सुषमा स्वराज या २०१२ मध्ये म्हणाल्या होत्या की पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या दरांमुळे पंतप्रधानांची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे. आज भाजपचे सरकार असताना सुषमा स्वराज यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बद्दल तसाच विचार करतात का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. काँग्रेस सरकारच्या काळात झालेला भ्रष्टाचार इंधन दरवाढीस कारणीभूत आहे असे विधान पंतप्रधानांनी केले आहे. हे विधान मूर्खपणाचे असल्याची टिका निरुपम यांनी केली आहे. चार वर्षांपूर्वी २०१२ मध्ये, काँग्रेसचे सरकार होते, त्यावेळेस महाराष्ट्र राज्यावर जागतिक बँकेचे २ लाख करोड रुपये कर्ज होते. आज भाजप सरकारच्या काळात हेच कर्ज वाढून ४ लाख करोड रुपये इतके झालेले आहे. यानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणखी कर्जाची मागणी करत असल्याने एवढा पैसा जातो कुठे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या मोर्चामध्ये माजी मंत्री सुरेश शेट्टी, माजी आमदार चरण सिंग सप्रा, बलदेव खोसा, मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अजंता यादव, आजी-माजी नगरसेवक, मुंबई काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाले होते.
No comments:
Post a Comment